www.24taas.com,वॉशिंग्टन
बलाढ्य अमेरिकेला आर्थिक संकटात लोटण्याची भीती असणारं फिस्कल क्लिफ संकट टाळण्यात बराक ओबामा प्रशासनाला यश आलंय. मात्र यामुळे अमेरिकेतल्या धनाढ्य लोकांना वाढीव कर भारावा लागणार आहे.
ज्या धनिकांचं वार्षिक उत्पन्न साडेचार लाख डॉलरहून अधिक आहे, अशाच लोकांना हा वाढीव कर भरावा लागणार आहे. गेल्या वीस वर्षात पहिल्यांदाच वाढीव कराचा बोजा श्रीमंतांवर लादण्यात आलाय. किंबहूना काही धनिक मंडळींनी अशा प्रकारची करवाढ सोसण्याची तयारीही दर्शवली होती. या करवाढीमुळं ९९ टक्के अमेरिकन नागरिकांवरी करवाढीचं संकट टळलंच आहे. करवाढीचा प्रस्ताव सिनेटमध्ये बहुमतानं मंजूर झाला.
माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळातलं सवलतींची खैरात करणारं पॅकेज ३१ डिसेंबर २०१२रोजी संपलंय. त्यामुळे अमेरिकन नागरिकांवर सहाशे अब्ज डॉलरची करवाढ लादली जाणार होती. शिवाय सरकारी खर्चाला मोठी कात्री लागणार होती. मात्र त्यावर ओबामा प्रशासनानं यशस्वी तोडगा काढल्यानं अमेरिकेवर घोंघावणारं फिस्कल क्लिफचं वादळ दूर झालयं.