रियाध : गेल्या वर्षी सौदी अरेबियातील 23 स्त्रियांनी आपल्या अधिकारासाठी आवाज उठवत आपल्या जन्मदात्यांनाच अद्दल घडवलीय, अशी माहिती ‘नॅशनल सोसायटी फॉर ह्युमन राईटस’ समितीनं दिलीय.
‘नॅशनल सोसायटी फॉर ह्युमन राईटस’ (NSHR) च्या मदतीनं तब्बल या स्त्रियांनी ‘अधल’ची इस्लामविरोधी परंपरा मोडीत काढलीय. आपली इच्छा असतानाही पालकांनी जबरदस्तीनं लग्न करण्यापासून रोखल्याबद्दल या स्त्रियांनी आवाज उठवलाय. या प्रकारच्या प्रकरणांना अरेबिकमध्ये ‘अधल’ म्हटलं जातं.
रियाधमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 11 तक्रारी निकालात निघाल्यात. त्यानंतर मदिना इथं चार तर दमम, मक्का, जेदाह आणि जेझान इथं प्रत्येक दोन तक्रारींची नोंद झाली होती.
मानवाधिकार समितीच्या कार्यकर्त्या सुहेला झैन अल-अबिदिन हमद यांनी ‘अधल’पासून अशा स्त्रियांचं संरक्षण करण्यासाठी नवीन कायदा अस्तित्वात यावा, अशी मागणी केलीय. ‘स्त्रियांनी वयाचा एक टप्पा ओलांडल्यानंतर लग्नाचा निर्णय त्यांनी स्वत: घ्यावा, यामध्ये पालकांचा हस्तक्षेप असू नये असा कायदा अस्तित्वात येण्याची गरज आहे’ अशी मागणी त्यांनी केलीय.
‘अधल’ या प्रकारला बळी पडलेल्य स्त्रिया सध्या आपल्या पालकांच्या द्या आणि करुणेच्या भीकेवर जगत आहेत. स्त्रियांच्या, मुलींच्या पैशांवर जगू इच्छिणारे पालक जबरदस्तीनं मुलींना लग्न करण्यापासून रोखतात. अशी कित्येक प्रकरणं ‘नॅशनल सोसायटी फॉर ह्युमन राईटस’च्या निदर्शनास आली होती.
यामुळे स्त्रिया मानसिक संतूलन हरवणं, डिप्रेशनमध्ये जाणं, आत्महत्येचा प्रयत्न करणं किंवा ड्रग्जच्या आहारी जाणं अशा कित्येक प्रकारांना बळी पडत असल्याचंही समोर आलंय.
काय आहे ‘अधल’…
मुस्लिम बहुल देशांमध्ये ‘अधल’ हा अरेबिक शब्द वापरला जातो. स्त्रियांना जबरदस्तीनं लग्नसुखापासून वंचित ठेवून ‘शरीया’ कायद्याचं उल्लंघन करणाऱ्याला ‘अधल’ असं म्हटलं जातं. आपल्या स्वार्थासाठी आपल्याच कुटुंबातील मुलींना, महिलांना पारंपरिक भूमिका निभावण्यापासून रोखलं जातं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.