भारत-ऑस्ट्रेलियात अणुकरार, युरेनियम उपलब्ध होणार

भारत आणि ऑस्ट्रेलियानं आज नागरी अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी केली. फ्रान्स आणि अमेरिकेनंतर भारतासोबत असा करार करणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा देश ठरलाय.

Updated: Sep 5, 2014, 10:25 PM IST
भारत-ऑस्ट्रेलियात अणुकरार, युरेनियम उपलब्ध होणार title=

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियानं आज नागरी अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी केली. फ्रान्स आणि अमेरिकेनंतर भारतासोबत असा करार करणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा देश ठरलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा करार अस्तित्वात आला. ज्यामध्ये, आता कॅनबरा आता नवी दिल्लीला युरेनियमचा पुरवठा करणार आहे. सोबतच दोन्ही देशांनी सुरक्षा आणि व्यापार क्षेत्रात एकमेकांना सहकार्य वाढवण्याच्या उपायांवरदेखील चर्चा केली. 

करारानुसार ऑस्ट्रेलिया भारताला नागरी अणुऊर्जेसाठी युरेनियमचा पुरवठा करेल. त्यामुळे आयात युरेनियमवर निर्माण होणाऱ्या 1840 मेगावॅट ऊर्जेसाठी इंधनाचा पुरवठा आणखी वाढणार आहे. ऑस्ट्रेलिया हा जगातला तिसरा युरेनियम समृद्ध देश आहे. 

युरेनियमखेरीज रेडियो आयसोटोप्सची निर्मिती, अणुसुरक्षा याबाबतही दोन्ही देशांमध्ये सहकार्य राहणार आहे. याखेरीज संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरही मोदी आणि अबॉट यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

भारत आणि ऑस्ट्रेलियानं 2012 पासूनच युरेनियमच्या विक्रीसंबंधी चर्चा सुरु केली होती. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं नवी दिल्लीला युरेनियम निर्यात करण्यावर लावलेली दीर्घकालीन बंदी उठवली होती. त्यामुळे, भारताच्या महत्त्वकांक्षी अणुऊर्जेसाठी लागणाऱ्या गरजा पूर्ण होणार आहेत.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.