क्वालांलपूर : मलेशिया दौऱ्यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांच्यात सोमवारी द्विपक्षीय चर्चा पार पडली. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रात एकमेकांना खोलवर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देण्यावर भर देण्यात आला.
मलेशियाच्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मोदींनी शानदार स्वागतासह द्विपक्षीय कार्यक्रमांना सुरुवात केली. यावेळी दोन्ही देशांदरम्यान तीन करारही करण्यात आले.दोन्ही देशांदरम्यान विविधता आणि लोकशाही मजबूत आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षेच्या गरजा एकत्र मिळून पूर्ण करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
'दहशतवाद जगासाठी घातक आहे. यासाठी जगभरातील देशांची एकजूट होणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले. तसेच मलेशियाशी भारताचे जुने नाते आहे. मलेशियामध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची साथ दिली होती आणि ते आझाद हिंद सेनेत दाखल झाले होते,' असे मोदींनी यावेळी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.