पाकिस्तानातील नऊ महिन्याच्या मुसाची हत्येच्या आरोपातून मुक्तता

पाकिस्तानमध्ये मुसा खान या नऊ महिन्याच्या बालकालाही हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

Updated: Apr 13, 2014, 06:34 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, लाहोर
पाकिस्तानमध्ये मुसा खान या नऊ महिन्याच्या बालकालाही हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच बालकाची हत्येच्या आरोपातून मूक्तता करण्यात आली आहे. पाक पोलिसांनी नऊ महिन्याच्या बालकाला हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती आणि न्यायालयामध्ये हजर केलं होतं. न्यायालयानं या बालकालाचा जामीन शेवटी मंजूर केला. पोलिसांनी त्यामुळं आता नऊ महिन्यांच्या मुसाचं नाव एफआयआर मधून वगळलंय.
पाकिस्तानी कायद्यानुसार, वय वर्षे सातपर्यंतच्या बालकानं केलेल्या कृत्याला गुन्हा मानता येत नाही. लाहोर इथं पोलिसांनी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांसह यासिन खान यांच्या घरावर एक फेब्रुवारी रोजी छापा घातला होता. गॅस चोरीच्या आरोपावरुन हा छापा टाकण्यात आला होता. छापा टाकण्यावेळी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपात मुसासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पोलिसांनी अटक केली होती.
पोलिसांनी याआधी मुसाला न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी उपस्थितांना धक्काच बसला होता. न्यायालयाने मुसाला ५०,००० रुपयांचा जामीन मंजूर केला होता. मुसाच्या जामिनाची मुदत शनिवारी संपणार होती. त्यामुळे खान कुटुंबियांनी मुसाला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले होते. मात्र यावेळी पोलिसांनी मुसाचे नाव `एफआयआर`मधून वगळल्याची माहिती नातेवाईकांना दिली. तसेच कूटूंबातील इतर व्यक्तींवर खटला चालू राहणार असल्याचे देखील सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.