लंडन : नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई हिच्यावर हल्ला करणाऱ्या १० दहशतवाद्यांपैकी आठ दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली आहे. तशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
नोबेल पुरस्कार विजेती मलाला हिच्यावर एप्रिलमध्ये हल्ल्या केल्या प्रकरणी दहशतवादविरोधी न्यायालयाने या दहा जणांना दोषी ठरवत २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. यापैकी केवळ दोन दहशतवादी तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तुरुगांतील दहा पैकी आठ जणांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आल्याचे पाकिस्तानचे उच्च आयुक्तालयाचे प्रवक्ते मुनीर अहमद यांनी सांगितले. तसेच स्वात जिल्हा पोलीस प्रमुख सलीम मारवाट यांनीही आठ जणांची तुरुंगातून सुटका करण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिलाय.
पाकिस्तानात नऊ ऑक्टोबर २०१२ रोजी मलाला शाळेतून परत येत असताना बसमध्ये घुसून तालिबान्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये १० जणांना अटक करण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.