भारत युद्धखोरीच्या प्रयत्नात - पाकिस्तान

भारत-पाकमधील तणावात अधिक भर घालणारे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी केलेय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन भारतीय जवानांची हत्या झाल्यानंतर भारत युद्धखोरीच्या प्रयत्नात असल्याचा आरोप हिना रब्बानी खार यांनी येथे केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 16, 2013, 02:25 PM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क
भारत-पाकमधील तणावात अधिक भर घालणारे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी केलेय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन भारतीय जवानांची हत्या झाल्यानंतर भारत युद्धखोरीच्या प्रयत्नात असल्याचा आरोप हिना रब्बानी खार यांनी येथे केलाय.
अमेरिकेत एशिया सोसायटीतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारतावर हा आरोप करताना पाकिस्तानने भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्याचा आरोप फेटाळून लावला. दरम्यान, भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला कडक शब्दात समज दिली आहे. त्यानंतर पाकिस्ताने पलटवार करताना कांगावा केलाय.
भारतीय जवानांची हत्या झाल्याच्या घटनेनंतर भारत सरकार आणि लष्करातील उच्च अधिकाऱ्यांकडून जी वक्तव्ये करण्यात आली आहेत. त्यामुळे पाकिस्तान खूप निराश झाला आहे. भारताची वक्तव्ये ही युद्धखोर आहेत, असे खार यांनी म्हटलंय.
दक्षिण आशियातील या दोन्ही देशांना सध्याच्या परिस्थितीत युद्ध परवडणारे नाही. आम्ही या बाबतीत संयम पाळला आहे. असेच भारतानेही संयम पाळायला हवा. त्यामुळे दोन्ही देशांमधील चर्चा कोणतेही विघ्न न येता व्हावी, याला आमचे प्राधान्य आहे. पूर्वीसारखे पाकिस्तान सरकार असते तर, भारताच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले असते, अशी बोंबही हिना खार यांनी मारलीय.