www.24taas.com, वृत्तसंस्था, जिनेव्हा
आजच्या घडीला जगातील सुमारे एक अब्ज नागरिक उघड्यावर शौचविधी आणि मलमूत्र विसर्जन करीत असल्यानं जागतिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याचं परखड मत जागतिक आरोग्य संघटना आणि ‘युनिसेफ’नं तयार केलेल्या अहवालात व्यक्त केलंय. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणार्या नागरिकांच्या प्रमाणात भारत आघाडीवर असल्याचंही त्यात नमूद करण्यात आलंय.
उघड्यावर शौचविधी करण्याच्या प्रकारामुळं कॉलरा, डायरिया, कावीळ आणि टायफॉईडसारखे प्राणघातक आजार पसरतात. अशाच आजारांमुळं जगभरात पाच वर्षांखालील बालकांचा मोठ्या संख्येनं मृत्यू झाला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सॅनिटेशन आणि हेल्थ विभागाचे सहसंयोजक ब्रूस गॉर्डन यांनी म्हटलं आहे.
भारतात ५९ कोटी ७० लाख नागरिक उघड्यावर शौचाला बसतात. त्यामुळं देशात कॉलरा, कावीळ, डायरिया आणि टायफॉईडसारख्या साथींच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतोय. बहुतांश नागरिक पाणवठ्यावर अथवा नदीनाल्यांमध्ये शौचविधी करीत असल्यानं तिथल्या नागरिकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळणंही कठीण झालंय, असं ‘प्रोग्रेसिंग ऑन ड्रिंकिंग वॉटर ऍण्ड सॅनिटेशन २०१४ अपडेट’ या युनोच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांनीही देशातील शौचविधीच्या दुर्दशेबद्दल अनेकदा तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.