भारत सोडण्याची इच्छा नाही - तसलिमा

यापुढे बांग्लादेशनं परवानगी दिली तरी पुढचं आयुष्य भारतातच व्यतीत करायचंय, असं बांग्लादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांनी म्हटलंय. भारतामध्ये दीर्घकालीन रेसिडेंट परमिट मिळण्याची त्यांना आशा आहे.

Updated: Aug 6, 2014, 04:01 PM IST
भारत सोडण्याची इच्छा नाही - तसलिमा title=

नवी दिल्ली : यापुढे बांग्लादेशनं परवानगी दिली तरी पुढचं आयुष्य भारतातच व्यतीत करायचंय, असं बांग्लादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांनी म्हटलंय. भारतामध्ये दीर्घकालीन रेसिडेंट परमिट मिळण्याची त्यांना आशा आहे.

एका मुलाखतीदरम्यान तसलिमा यांनी हे वक्तव्य केलंय. ‘मला भारतातच राहायचंय कारण मी आणखी कुठे जाणार... मी यूरोपची नागरिक आहे आणि अमेरिकेची स्थायी रहिवासी... पण, भारताच्या आणि बांग्लादेशच्या सांस्कृतिक समानतेमुळेच मी भारताची स्थायिक होण्यासाठी निवड केली’ असं तसलिमा यांनी म्हटलंय.

आता मला बांग्लादेशकडून प्रवेश करण्याची परवानगीदेखील मिळाली तरीही मी माझं पुढचं सगळं आयुष्य भारतातच व्यतीत करणं मला आवडेल, असंही त्यांनी म्हटलंय. 

‘गेल्या 20 वर्षांपासून बांग्लादेशपेक्षा जास्त मित्र माझे भारतात आहेत. आपण या पद्धतीच्या विचारधारांवर आयुष्य जगत असतो तेव्हा नातेवाईक नाहीत तर ते लोक तुमच्यासाठी महत्त्वाचे होतात ज्यांच्या सिद्धांतावर तुम्हाला विश्वास असेल... बांग्लादेशच्या प्रकाशकांनी आणि विचारवंतांनी मला संपर्क करण्याचे कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत... त्यामुळे माझ्या देशातलं आणि माझं नातंच तुटलंय... असंही त्यांनी म्हटलंय. 

तसलिमानं रेसीडेंट परमिटसाठी अर्ज केला होता पण गृहमंत्रालयाकडून त्यांना एका वर्षाऐवजी दोन महिन्यांचा व्हिजा मिळाला. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दीर्घकालीन व्हिजा मिळण्याची आशा व्यक्त केलीय. गृहमंत्र्यांनी आपल्याला दीर्घकालीन व्हिजा मिळेल, असं आश्वासन दिल्याचंही त्यांनी म्हटलंय... 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अनेकदा आपलं समर्थन केल्याचंही त्यांनी म्हटलंय. निवडणुकीदरम्यान एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना मोदींनी पश्चिम बंगालनं माझ्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध टीका केली होती. तसंच 2007 साली काही मुस्लिम कट्टरपंथियांमुळे पश्चिम बंगालमधून मला बाहेर काढण्यात आलं होतं. त्यावेळी, मोदींसहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणाऱ्या अनेक जणांनी माझं समर्थन केलं होतं, असंही तसलिमा नसरीन यांनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.