www.24taas.com, वॉशिंग्टन
एक करोड रुपयांचा बक्षिस ज्याच्या नावावर जाहीर झालंय तो लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज मोहम्मद सईद पाकिस्तानात बेफिकिरपणे फिरतोय... हे दुसरं तीसरं कुणी नाही तर स्वत: हाफिजनंच म्हटलंय. तसंच माझं भविष्य देवाच्या हातात आहे अमेरिकेच्या नाही, असंही त्यानं म्हटलंय. २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हाफिज मास्टरमाईंड आहे.
न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना हाफिजनं असं म्हटल्याचा दावा या वृत्तपत्रानं केलाय. मी पाकिस्तानात एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच संचार करतो असं हाफिजनं या वृत्तपत्राशी बोलताना म्हटलंय. लाहोरमध्ये हाफिज सध्या वास्तव्य करतोय. तो आणि त्याचं परिवार राहत असलेल्या परिसरात एक मजबूत निवासस्थान, एक कार्यालय आणि मस्जिद उभारण्यात आलीय. टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईदच्या सुरक्षेसाठी केवळ त्याचे विश्वासू साथीदारच नाहीत तर पाकिस्तानच्या सरकारकडूनही सुरक्षा तैनात करण्यात आलीय. पाकिस्तानच्या कोर्टाने मला निर्दोष ठरवले असताना अमेरिकेचा आमच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास का नाही, असा सवालही त्याने केला. तसेच १९९४मध्ये मी शिकागो, बोस्टन आणि ह्युस्टनला जाऊन आलो, असंही त्यानं मुलाखती दरम्यान म्हटलंय.
गेल्या वर्षी याच हाफिज सईदनं अनेक सभा गाजवल्या होत्या आणि या सभांचं प्रक्षेपण टीव्हीवरही करण्यात आलं होतं. पाकिस्तान नेहमीच आपले दहशतवादी कारवायांशी आणि संघटनांशी संबंध नसल्याचा दावा खोटा असल्याचंही टाईम्सनं म्हटलंय.