www.24taas.com, इस्लामाबाद
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड जकी-उर-रहमान लखवी उच्च सुरक्षा असणाऱ्या जेलमध्ये बंद असतानाही तो बाप कसा बनू शकला, असा सवाल भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानला केला आहे. लष्करचा कमांडर असलेला लखवी सध्या पाकिस्तानमधील रावळपिंडी येथील कडेकोट सुरक्षा असणाऱ्या अडियाला जेलमध्ये बंद आहे.
गेल्या २५ नोव्हेंबरला हा प्रश्न भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानला विचारला आहे. पाकिस्तानी वेबसाइट द न्यूज इंटरनॅशनलच्या एका वृत्तानुसार, पाकिस्तानने याबाबत अद्याप भारताला त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
सौदी अरेबिया येथे अटक करण्यात दहशतवादी अबु जुंदाल याला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर भारताने पाकिस्तानला हा प्रश्न विचारला आहे. अबु जुंदालने चौकशीत कबुल केले आहे की, तो पाकिस्तानमध्ये गेला होता. तसेच मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतात घेऊन आला होता.
21 जून 2012 रोजी सौदी अरेबियामधून भारतात आणलेल्या जुंदालने हे ही कबुल केले आहे की, मुंबई हल्ल्याच्या वेळी तो कराची येथील कंट्रोल रूममध्ये उपस्थित होता. जुंदालने हे ही सांगितले की, कराची कंट्रोल रुममध्ये त्यावेळी हाफीज सईद हा उपस्थित होता.
जुंदाल हा भारतीय नागरिक असूनही त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट सापडला आहे. जुंदालकडे लष्करच्या हेडक्वार्टरच्या पत्त्यावर रियासत अली नावाने पासपोर्ट सापडला आहे. जुंदालने चौकशीदरम्यान सांगितले आहे की, 2010 मध्ये जकी-उर-रहमान लखवीने मला फोनवरुन माहिती दिली की, तो अडियाला जेलमध्ये राहूनही वडील बनला आहे. लखवीने जुंदालला सांगितले होते की, जेलमध्ये त्याला भेटण्यासाठी सगळ्यात छोटी पत्नी येते. तिला भेटण्याची परवानगी आहे. तसेच विशेष मागणी केल्यानंतर त्याला पत्नीशी संबंध ठेवण्यास संमती दिली गेली होती.
भारताने हाच मुद्दा उठवत पाकिस्तानला पत्र लिहून आरोप केला आहे की, लखवीला जेलमध्ये व्हीव्हीआयपीसारखे सेवा मिळत आहे. त्याला मोबाईल वापरण्याची परवानगी दिली आहे कारण तो जेलमधून लष्कराच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात राहू शकेल.
लखवी हा मुंबई हल्ल्यातील मुख्य मास्टरमाईंड आहे. त्याबाबतची माहिती कसाबने चौकशीदरम्यान दिली होती. मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानने लखवीसह लष्कराच्या 12 दहशतवाद्यांना अटक केली होती. लखवीने कसाबच्या कुटुंबियांना दीड लाख रुपये देण्याचे वचन दिले होते, असे कसाबने चौकशीत सांगितले होते. तेव्हापासून लखवी रावळपिंडीच्या जेलमध्ये बंद आहे.