www.24taas.com, इस्लामाबाद
अजमल कसाब याच्या फाशीचा बदला म्हणून भारतात हल्ले करण्यात येईल, अशी धमकीच पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना ‘पाक तालिबान’नं दिलीय.
२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या अजमल कसाब याला बुधवारी सकाळी पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी दिली गेली. कसाबनं त्याच्या इतर नऊ साथीदारांसोबत केलेल्या या हल्ल्यात तब्बल १६६ जण मारले गेले होते तर ३०० जण जखमी झाले होते. पाक सरकारच्या म्हणण्यानुसार, कसाबचं शव पाकिस्तानात आणण्यासाठी कसाबच्या परिवाराकडून अजून पाकिस्तान सरकारकडे कोणतीही मागणी किंवा सूचना करण्यात आलेली नाही. पण, याचवेळेस पाकिस्तानातील दहशतवादी संघटना पाक तालिबाननं हा मुद्दा उचलून धरलाय. कसाबचं शव पाकिस्तानात आणलं जावं, अशी मागणीच या संघटनेनं केलीय.
‘तालिबाननं भारतीय लोकांना निशाना बनवल्याचं’ पाक तालिबानचा प्रवक्ता इशानुल्लाह यानं म्हटलंय. एका अज्ञात स्थळावरून न्यूज एजेन्सी रॉयटर्सशी फोनवरून बोलताना तालिबाननं ही खुलेआम धमकी दिलीय. यावेळी, ‘आम्ही अजमल कसाबच्या फाशीचा बदला घेण्यासाठी भारतीय लोकांना आणि ठिकाणांना निशाना बनवण्याचा आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा निर्णय पक्का केलाय’ असं इशानुल्लाह यानं म्हटलंय. ‘भारतानं अजमल कसाब याचं शव पाककडे सुपूर्द करावं अन्यथा आम्ही भारतीय लोकांची धर-पकड सुरू करू आणि त्यानंतर कोणत्याही स्वरूपात त्यांचं शवही कुणाच्या दृष्टीस पडू शकणार नाही. भारतात कधीही आणि कोणत्याही ठिकाणावर हल्ला करण्याचाच तालिबानचा प्रयत्न राहणार आहे’ असंही त्यानं म्हटलंय.
पाक तालिबान ही दहशतवादी संघटनेचे अलकायदाशी अत्यंत जवळचे संबंध आहे. पाकिस्तानसाठीही ही डोकेदुखी ठरलीय. पाकमध्ये झालेल्या अनेक आत्मघातकी हल्ल्यांचा आरोप या संघटनेवर आहे. पण, अजूनपर्यंत पाकिस्तानच्या बाहेर कोणत्याही हल्ल्यांना मूर्त रुप देणं या संघटनेला साध्य झालेलं नाही.