www.24taas.com, झी मीडिया, क्वीसलँड
एखाद्या मच्छिमाराच्या जाळ्यात सापडलेला मासा पाहणं ही गोष्ट तशी काही नवीन नाही. पण, याच जाळ्यात सापडलेल्या मृत माशाच्या गळ्यात मात्र एखादा जिवंत बेडूक आढळला तर....
होय, तुम्हाला जसं या घटनेचं आश्चर्य वाटतंय तसंच किंबहुना त्यापेक्षा जास्त, ही घटना स्वत:च्या उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या मच्छिमारांना वाटलं यात काही शंका नाही.
जाळ्यात सापडलेला मोठा मासा पाहून या माशाला फासणाऱ्या मच्छिमाराला आनंद झालाच. पण, त्याहीपेक्षा त्याला जास्त आनंद झाला जेव्हा त्यानं या माशाच्या मोठ्या तोंडात आतल्या भागात एक हिरव्या रंगाचं बेडूक पाहिलं. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मासा तर मृत झाला होता पण माशाच्या तोंडात असूनही बेडूक जिवंत होतं. माशाच्या तोंडातून सुखरुप बाहेर पडलेल्या त्या बेडकालाही भलताच आनंद झाला असेल यात काही शंका नकोच...
ही घटना घडलीय क्विन्सलँडच्या टाऊन्सविले शहरात. विकेन्ड घालवायचा म्हणून एंगस जेम्स इथं मासे पकडण्यासाठी दाखल झाला होता. ‘मी तर बेडकाला पाहिलं आणि चकीतच झालो. मला अगोदर वाटलं की माशाच्या गळ्यात हिरव्या रंगाचा घास आहे. पण मग आतल्या बेडकानं आपल्या डोळ्यांची उघडझाप केली’ असं जेम्सनं म्हटलंय.
जेम्स या बेडकाला त्या माशाच्या तोंडातून बाहेर काढणार त्याआधीच बेडकानं त्याच्या डोक्यावरून उडी मारली आणि तिथून उड्या मारत निघून गेलं. एव्हाना जेम्सनं या बेडकाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं. आपल्याकडे नेहमीच कॅमेरा असतो आणि म्हणूनच हा दुर्मिळ फोटो आपण काढू शकलो, असं जेम्स म्हणाला.
हिरव्या रंगाचं बेडूक ऑस्ट्रेलियाच्या आजुबाजुच्या भागांत म्हणजेच न्यू गुएना, न्यूझीलंड आणि अमेरिकेत आढळतं. इतर बेडकांपेक्षा हे बेडूक थोडं लांब असतं. त्यांची लांबी चार इंचापर्यंत असू शकते.
हा बेडूक माशाच्या तोंडात किती वेळापासून होता, हे सांगणं मात्र अवघड आहे. परंतु, एखादा बेडूक जवळजवळ 16 वर्ष एखाद्या ठिकाणी कैदेत जिवंत राहू शकतो. जेम्सनं या बेडकाचा फोटो एका मॅगझीनला दिला होता. या मॅगझीननं हा फोटो फेसबुकवर पोस्ट केलाय... आणि आता या फोटोतील बेडकानं फेसबुकवर चांगलाच धुमाकूळ घातलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.