मंगळावर सर्वप्रथम वसाहत पृथ्वीवरील जिवाणूंची

मंगळावर जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मंगळवार पाय ठेवतांनाही विचार करावा लागणार आहे. कारण मंगळावर पृथ्वीवरील जिवाणुंची सर्वप्रथम वसाहत असण्याची शक्यता आहे.

Updated: May 5, 2014, 02:09 PM IST

www.24taas.com, झी मी़डिया, वॉशिंग्टन
मंगळावर जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मंगळवार पाय ठेवतांनाही विचार करावा लागणार आहे. कारण मंगळावर पृथ्वीवरील जिवाणुंची सर्वप्रथम वसाहत असण्याची शक्यता आहे.
मंगळावर वसाहत स्थापन करण्यासाठी माणसाचे जोरदार प्रयत्न चालले असले, तरी ही स्पर्धा जिवाणू (बॅक्टेरिया) जिंकणार असून मंगळावर पहिली वसाहत या जिवाणूंचीच होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या स्पर्धेत माणसाचा पराभवच होईल अशी दाट शक्यता दिसत आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हे तज्ज्ञ नासाचे असून त्यात एक भारतीय अमेरिकन सदस्यही आहे.
नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जीवाणू वा सूक्ष्म जीव अवकाशयानावर बसून मंगळावर जातात. मंगळावर त्यांची वसाहत तयार होऊ शकेल आणि पृथ्वीवरून मंगळावर जाणार्‍या अंतराळवीरांना ते परग्रहवासी असल्याचे वाटेल. हे जीवाणू मंगळ व इतर ग्रह प्रदूषित करतील. शास्त्रज्ञांना त्यांची उत्पत्ती पृथ्वीवर झाली की मंगळावर झाली, हे कळू शकणार नाही.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर करण्यात आलेल्या प्रयोगात सूक्ष्म जीवाणूंचा असा आंतरग्रहीय पातळीवर प्रवास होऊ शकतो, हे लक्षात आले आहे.
आजपर्यंत चित्रपटात मंगळावरील परग्रहवासी पृथ्वीवर हल्ला करतात, असे दाखविण्यात आले आहे; पण परिस्थिती उलट आहे. पृथ्वीवरील जीवाणू मंगळावर वसाहत करतील. मंगळावर पाठविल्या जाणार्‍या यानाबरोबर विविध प्रकारचे सूक्ष्म जीवाणू पाठविले पाहिजेत. मंगळावर जीवन तग धरू शकते की नाही, हे या जीवाणूंच्या अस्तित्वावरून आपल्याला कळू शकेल.
अलीकडेच झालेल्या संशोधनात काही सूक्ष्म जीवाणू अत्यंत कठीण परिस्थितीतही तग धरत असल्याचे आढळले आहे.
अवकाश प्रवासात ते विविध प्रकारची संरक्षक यंत्रणा वापरून यानातून सुरक्षितपणे विविध ग्रहांवर पोहोचू शकतील, असे नासाच्या जेट प्रॉप्युल्जन लॅबरोटरी येथे काम करणारे भारतीय संशोधक क्षितिज जे व्यंकटेश्‍वरम यांनी म्हटले आहे.
पुष्परहित वनस्पतींचे बीजकरण करणारे स्पोअर जीवाणू कोणत्याही परिस्थितीत तग धरू शकतात. बॅसिलस प्युमिलस एसएएफआर-0३२ हे जीवाणू यान स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या स्वच्छकांनाही दाद देत नाहीत, असे आढळले आहे.
या जीवाणूंनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १८ महिने तग धरली होती. अँस्ट्राबायोलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.