नवी दिल्ली : पठाणकोट हल्ला, दहशतवादी कारवाया, कुलभूषण जाधव प्रकरण या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानच्या ताणल्या गेलेल्या संबंधांवर अमेरिकाही लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारत कारवाई करू शकतं, अशी शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेनं व्यक्त केलीय.
अमेरिकन गुप्तचर संघटना सेन्ट्रल इंटेलिजंस एजन्सीनं (CIA)चेतावनी देत भारत पाकिस्तानाच्या सिमेत घुसून 'सिमेपलिकडून' होणाऱ्या हल्ल्यांना उत्तर देऊ शकतं... असं म्हणत भारताकडून पाकिस्तानात कारवाई होऊ शकते, असं सूचित केलंय. सीनेट सशस्र सेवा समितीच्या सुनावणीदरम्यान मंगळवारी सीआयएचे प्रमुख लेफ्टनंट जनरल विन्सेन्ट स्टेवार्ट यांनी ही गोष्ट उघड केलीय. अण्वस्र शक्तीसहीत सज्ज असलेल्या दोन्ही शेजारी देशांमध्ये सध्या सुरू असलेला गोळीबार एका संघर्षाचं रुप घेऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलंय.
गेल्या वर्षी पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत प्रवेश करून झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण बनल्याचं त्यांनी म्हटलंय. यावर्षी हे संबंध आणखीन बिघडू शकतात, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केलीय. मुख्य म्हणजे, भारतात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीय.
सीमापार हल्ले थांबले आणि पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीत प्रगती झाली तर दोन्ही देशांमध्ये चर्चा पुन्हा सुरू होऊन तणाव कमी होण्याची शक्यताही या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आलीय.