बीजिंग : चीनी रेल्वेचा रूळ आता थेट तिबेट सिमेला लागून येणार आहे. नेपाळ, भारत आणि भूतानच्या सीमेपर्यंत हे रेल्वेचं जाळं पसरवण्यात येणार आहे. हे मार्ग 2020 पर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश चीनचा आहे. चीनच्या सरकारी वर्तमानपत्रा ही बातमी प्रकाशित झाली आहे.
चीनने 2006 मध्येच तिबेटची राजधानी असलेल्या ल्हासापर्यंत लोहमार्ग बांधला आहे. या रेल्वेमुळे तिबेटची स्वतंत्र संस्कृती नष्ट होऊन चीनमधून येथे येणाऱ्या स्थलांतरितांचा लोंढा अधिक वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्समध्ये यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाले आहे. तिबेटमधील दुसरे सर्वांत महत्वाचे पंचेन लामा यांचे स्थान असलेल्या शिंगत्से येथून हा लोहमार्ग पुढे सीमारेषेपर्यंत वाढविला जाणार आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज शुक्रवारी नेपाळला भेट देणार आहेत. या भेटीमध्ये या हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या देशामधील जलविद्युत प्रकल्पांच्या विकासासंदर्भातील करारावर चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे सांभाळल्यानंतर शेजारी देशांशी संबंध अधिक बळकट करण्याच्या धोरणावर भर असल्याचे संकेत दिले आहेत. चीनची ही महत्त्वाकांक्षी योजना भारताच्या या धोरणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.