मुंबई : तुम्हीही तुमच्या कामात आणि व्यवसायात इतके गुंग असाल की तुमच्या मुलं मोठी कधी झाली हे कळलंच नसेल... किंवा मोठी होताना तुमचा त्यात कोणत्याही प्रकारचा सहभाग नसेल तर ही बातमी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल...
मे 2013 मध्ये मुलीनं आपल्या पित्याला लिहिलेली चिठ्ठी वाचल्यानंतर या अरबपती बॉसनं आपल्या नोकरीवर पाणी सोडलं. आपल्या मुलीला वेळ देता यावा, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय.
मोहम्मद अल एरियन... तब्बल 1,21,921 अरब रुपयांच्या एका इन्व्हेस्टमेंट कंपनीचा बॉस... पण, ‘पिमको’च्या या प्रमुखाच्या हातात 10 वर्षांच्या मुलीचं पत्र पडलं. त्यात तिनं आपल्या आत्तापर्यंतच्या जीवनातले 22 माइलस्टोन लिहिले होते, ज्यावेळी तिचे वडील मात्र तिच्यासोबत नव्हते. कारण, तुम्ही तेव्हा खूप जास्त व्यस्त होतात, असं कारणंही मुलीनं आपल्या पित्याला दिलंय.
या नोटमध्ये मुलीनं तिच्या शाळेचा पहिला दिवस, आपल्या शाळेतील हॅलो परेड आणि पहिली फूटबॉल मॅच तुम्ही ‘मिस्’ केलीत, अशी तक्रार केलीय. आपल्या मुलीचं हे पत्र वाचल्यानंतर मात्र कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या इन्व्हेस्टमेंट गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एरियन यांनी ‘पिमको’चा राजीनामा दिला.
एरियन यांचा हा राजीनामा त्यांच्या सहकाऱ्यांसाठी एका धक्क्यापेक्षा कमी नव्हता. कधी मिटिंगनिमित्त, कधी दौऱ्यावर, कधी अर्जंट फोन कॉल आला म्हणून तर कधी अचानक एखादं काम आलं म्हणून... कारणांची कमी नव्हतीच... म्हणून तर आपण आपल्या मुलीच्या आयुष्यातल्या इतके महत्त्वाचे क्षणांना मुकलो... ही सल एरियन यांच्या मनाला लागून होती. त्यामुळेच, आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय.
‘पिमको’चा राजीनामा दिल्यानंतर आज ते दररोज सकाळी आपल्या पत्नीसोबत आपल्या मुलीला झोपेतून जागं करतात. त्यानंतर ते स्वत: आपल्या मुलीसाठी नाश्ता तयार करतात आणि त्यानंतर तिला शाळेतही सोडायलाही जातात आणि आणायलाही...
कामासाठी, पोटापाण्याच्या सोईसाठी सकाळी लवकर घर सोडणारे आणि उशीरा घरी परतणारे अनेक आई-वडील सध्या पाहायला मिळताता. कदाचित सध्याची काळाची ही गरज आहे, असं म्हटलं जातं. पण, अशावेळी मुलांची मात्र त्यांची क्वचितच भेट होते... आणि ज्या व्यक्तीकडे पैशांची कमी नाही पण वेळेची कमी आहे... अशांना मात्र आपल्या वेळेचे, कामाचा आणि आपल्या कुटुंबीयांचा पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडेल असंच हे उदाहरण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.