प्रेमासाठी वाट्टेल ते : स्वत:लाच केलं कुरिअर!

प्रेमासाठी लोक काय करत नाही... पण, असंच तुम्ही प्रेम मिळवायला गेलात आणि तुमचाच जीव धोक्यात आला तर! होय, असं घडलंय... एका प्रेमवीरानं आपल्या प्रेयसीपर्यंत आपल्या भावना पोहचवण्यासाठी जे काही केलं त्यामुळे त्याचा स्वत:चाच जीव धोक्यात आला. ही घटना लंडनमध्ये घडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 30, 2012, 05:42 PM IST

www.24taas.com, लंडन
प्रेमासाठी लोक काय करत नाही... पण, असंच तुम्ही प्रेम मिळवायला गेलात आणि तुमचाच जीव धोक्यात आला तर! होय, असं घडलंय... एका प्रेमवीरानं आपल्या प्रेयसीपर्यंत आपल्या भावना पोहचवण्यासाठी जे काही केलं त्यामुळे त्याचा स्वत:चाच जीव धोक्यात आला. ही घटना लंडनमध्ये घडलीय.

झालं असं की, लंडनमध्ये राहणाऱ्या ‘हू सेंग’ या चीनी तरुणानं त्याची प्रेयसी ‘ली वांग’ हिच्यापर्यंत आपल्या भावना पोहचवण्यासाठी स्वत:लाच कुरिअर केलं. ‘डेली मेल’ या वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार हू यानं आपल्या एका मित्राच्या मदतीनं स्वत:ला एका मोठ्या डब्यात बंद करून घेतलं. हूच्या मित्रानंही त्याच्या सूचनांचं पालन करत हा डब्बा एका कुरिअर कंपनीच्या हवाली केला आणी ‘ली वांग’ पर्यंत हा डबा पोहचवण्याची सूचना केली.
पण, इथं कुरिअर कंपनीकडून एक भलतीच गफलत झाली आणि ही गफलतच हू याच्या जीवावर बेतली. कुरिअर कंपनीकडून ‘ली वांग’ हिचा दिला गेलेला पत्ताच गहाळ झाला आणि जे पार्सल अर्ध्या तासात पोहचायचं होतं ते पोहचण्यासाठी तब्ब्ल तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. हू याचा आणखी एक ली वांग हिच्या ऑफिसमध्ये कॅमेरा घेऊन उपस्थित होता. हू याला पाहिल्यावर ली वांगच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यासाठी हूनं त्याची नेमणूक केली होती. पण, झालं उलटच... कुरिअर पोहचल्यानंतर जेव्हा हा डब्बा उघडला गेला हू पटकन त्यातून बाहेर पडला. मात्र, त्याला नॉर्मल स्थितीत येण्यासाठी औषधांची गरज लागली.
जेव्हा हू याला याबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यानं म्हटलं की, ‘मला अपेक्षा नव्हती की एवढा वेळ लागेल. मी डब्याला भोक पाडण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. आणि मदतीसाठी आरडाओरडा करून मला ‘सरप्राईज’ची मजा घालवायची नव्हती’. कुरिअर कंपनीनं मात्र ‘आम्हाला जर असं काही पार्सलमध्ये असेल याची कल्पना असती तर आम्ही हे पार्सल घेतलंच नसतं’ असं स्पष्ट केलं. ‘ली वांग’ हिच्यासाठी मात्र हे चांगलंच ‘सरप्राईज’ ठरलं असेल याद कुणाचं दुमत नसावं.