वर्णभेदविरोधी नायक नेल्सन मंडेला यांचे निधन

दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचं जोहान्सबर्गमध्ये निधन झालंय.. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.. गेल्या काही महिन्यांपासून मंडेला फुफ्फुसाच्या आजारानं त्रस्त होते..

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 6, 2013, 07:56 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचं जोहान्सबर्गमध्ये निधन झालंय.. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.. गेल्या काही महिन्यांपासून मंडेला फुफ्फुसाच्या आजारानं त्रस्त होते..
दक्षिण अफ्रिकेचे विद्यमान अध्यक्ष जेकब जुमा यांनी सरकारी वाहिनीवरून मंडेला यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. 'मंडेला यांच्या निधनामुळे देश एका महान सुपुत्राला मुकला आहे,' अशा शोकभावना जुमा यांनी व्यक्त केल्या.
मंडेला यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. दक्षिण अफ्रिकेचे गांधी अशीही त्यांची ओळख होती. वर्णभेदाविरोधात मंडेला यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यासाठी मंडेलांनी २७ वर्ष तुरुंगवास भोगला... अध्यक्षपदाच्या काळात मंडेला यांनी जगातील अनेक देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी १९९३ साली नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं...
फुफ्फुसांच्या संसर्गामुळे मंडेला गेल्या वर्षभरापासून अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढ-उतार होत होते. त्यामुळे उपाचारासाठी वरचेवर त्यांना रुग्लायलात दाखल करावे लागत होते. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून डॉक्टरही प्रयत्नांची शर्थ करत होते. मात्र, त्यांना यश आले नाही. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
कुनू या जन्मगावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मंडेला यांच्या निधनामुळे दक्षिण अफ्रिकेसह जगभरात हळहळ व्यक्त होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.