बीजिंग : एस्कलेटरमध्ये अडकून एका महिलेला आपले प्राण गमवावे लागलेत... पण, या घटनेत महिलेचा हात धरून उभी असलेल्या आपल्या छोट्या मुलीला वाचवण्यात मात्र तिला यश आलं.
२६ जुलै रोजी चीनच्या हुबेई प्रांतातील जियांगशू इथं ही हृदयद्रावक घटना घडलीय. एका शॉपिंग मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या शियांग लियूजुआन या ३० वर्षीय महिलेनं एस्कलेटरमध्ये अडकल्यानं आपले प्राण गमवावे लागले.
शियांग लियुजुआन आपल्या पती आणि चिमुरडीसोबत या मॉलमध्ये खरेदीसाठी आली होती. शियांग आणि तिची मुलगी एस्कलेटरवर चढले असताना अचानक त्याच पॅनल सरकलं... हे लक्षात येताच शियांगनं आपल्या मुलीला वर ढकललं... वर उभ्या असलेल्या स्टाफनंही तातडीनं हालचाल करत मुलीला आपल्या ताब्यात घेतलं... पण शिआंग मात्र सरकलेल्या पॅनलमधून एस्कलेटरमध्ये अडकली... जवळपास चार तासानंतर या एस्कलेटरमधून मृत शिआंगच्या शरीराचे तुकडे - तुकडे बाहेर काढण्यात यश मिळालं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉलमधल्या एस्कलेटरचं काम सुरू होतं. काम करणाऱ्यांनी त्याचं मेटल पॅनल लावलं होतं. पण त्याचं स्क्रू फिट करणं मात्र ते विसरले. मेन्टेनन्ससाठी एस्कलेटर बंद असल्यानं मॉल व्यवस्थापनानं आपला स्टाफही तैनात केला होता. स्टाफनं शियांगला या एस्कलेटरवर न चढण्याची सूचनाही केली होती. पण, ती ही सूचना न ऐकताच एस्कलेटरवर आपल्या मुलीसह चढली. शियांगचा पती मात्र मागेच राहिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.