बलात्कार होणाऱ्या भारतातून आला म्हणून जर्मनीत इंटर्नशिप नाकारली

निर्भया प्रकरणावरील डॉक्यूमेंटरीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की झाल्याचा आरोप होत असतानाच जर्मनीतील एका ख्यातनाम विद्यापीठानं बलात्काराच्या प्रकरणांमुळं भारतीय विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Updated: Mar 9, 2015, 09:02 PM IST
बलात्कार होणाऱ्या भारतातून आला म्हणून जर्मनीत इंटर्नशिप नाकारली title=

नवी दिल्ली: निर्भया प्रकरणावरील डॉक्यूमेंटरीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की झाल्याचा आरोप होत असतानाच जर्मनीतील एका ख्यातनाम विद्यापीठानं बलात्काराच्या प्रकरणांमुळं भारतीय विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

भारतात राहणाऱ्या एका विद्यार्थ्यानं जर्मनीतील ख्यातनाम लिपझिग विद्यापीठातील बायोकेमिस्ट्री विभागात इंटर्नशिपसाठी ईमेलद्वारे अर्ज केला होता. या तरुणाला विद्यापीठातील बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्रमुख एनेट बेक सिकिंगर यांनी ईमेलद्वारे उत्तर दिलं आहे. यात त्या म्हणतात, भारतात बलात्काराच्या घटना आम्ही दर आठवड्याला वाचत असतो.

आमच्या विभागात बहुसंख्य महिला असल्यानं आम्ही ही मानसिकता खपवून घेत नाही किंवा अशा मानसिकेतला पाठिंबाही देत नाही. यामुळं आम्ही आमच्या विभागात भारतीय मुलांना इंटर्नशिप देऊ शकत नाही. विद्यापीठाकडून आलेलं उत्तर बघून विद्यार्थ्याला धक्काच बसला. विद्यार्थ्याच्या सहकाऱ्यानं हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांसमोर मांडला आहे. 

भारतातील जर्मनीचे राजदूत मायकल स्टिनर यांनी या प्रकारावर नाराजी दर्शवली. भारत हा बलात्काऱ्याचा देश नाही, असं सांगत त्यांनी विद्यापीठाच्या प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या प्रकारावरुन टीका सुरु होताच सिकिंगर यांनी घुमजाव केलं. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, आम्ही भारतीय विद्यार्थ्यांचं नेहमीच स्वागत केलं आहे असं त्यांनी सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.