सरबजीतचा पाचवा दयायाचना अर्ज

पाकिस्तानमध्ये बॉम्ब हल्ल्यांप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेला भारतीय कैदी सरबजीत सिंग याने पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी यांच्याकडे नव्याने दयायाचना अर्ज दाखल केला आहे. सरबजीतने दयेसाठी दाखल केलेला हा पाचवा अर्ज आहे.

Updated: May 31, 2012, 09:48 PM IST

www.24taas.com, लाहोर

 

पाकिस्तानमध्ये  बॉम्ब हल्ल्यांप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेला भारतीय कैदी सरबजीत सिंग याने पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी यांच्याकडे नव्याने दयायाचना अर्ज दाखल केला आहे. सरबजीतने दयेसाठी दाखल केलेला हा पाचवा अर्ज आहे. ४९ वर्षीय सरबजीत गेली वीस वर्षं पाकमध्ये शिक्षा भोगत असून सध्या तो लाहोरमधील कोट लखपत कारागृहात आहे.

 

१९९० मध्ये पाकमधील पंजाब प्रांतात झालेल्या बॉम्बहल्ल्यांप्रकरणी सरबजीतला दोषी ठरवण्यात आले आहे. या बॉम्बहल्ल्यांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. बॉम्बहल्ल्याच्या खटल्यामध्ये आपल्याला चुकून दोषी ठरवण्यात आल्याचे सरबजीतने अर्जामध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सरबजीतच्या नावाचा समावेश नव्हता. मनजीत सिंग नावाच्या व्यक्तीने पाकमधील विविध शहरांमध्ये चार बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. बॉम्बहल्ल्यांच्या वेळी सरबजीत भारतात असल्याचा लेखी पुरावा आपल्याजवळ असल्याचेही शेख यांनी सांगितले.

 

सरबजीत याला पाकिस्तानच्या लष्करी कायद्याअंतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याला २००८ मध्ये फाशी देण्यात येणार होती. मात्र, पाकचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्याच्या फाशीला स्थगिती देण्यात आली होती.

 

भारतामध्ये कैदेत असणारे पाकिस्तानी विषाणूतज्ज्ञ खलील चिश्ती यांची नुकतीच जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्यांना कुटुंबियांना भेटण्यासाठी पाकमध्ये जाण्याचीही परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली होती. त्यानुसार झरदारी यांनी सरबजीत यांची सुटका करावी, अशी मागणी या दयेच्या अर्जासोबत जोडण्यात आलेल्या कागदपत्रांसोबत करण्यात आली आहे. याचबरोबर दाखल केलेल्या दयेच्या अर्जासोबत एक लाख भारतीयांनी स्वाक्षऱ्या केलेली कागदपत्रे जोडण्यात आली आहेत.