www.24taas.com, नवी दिल्ली
जगातल्या विकसित देशांमध्ये सध्या मंदीचं सावट आहे. असं असलं तरी विदेशात राहणाऱ्या भारतीयांनी 2010 च्या तुलनेतं 2011 मध्ये मायदेशात पाठवलेला पैसा 22 टक्के जादा आहे. विदेशात पैसे कमावून मायदेशात पाठवण्याच्या बाबतीत भारत क्रमांक एकवर आहे. तर चीन, मेक्सिको दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहेत.
परदेशात कमाई करुन मायदेशी पैसा पाठवणाऱ्या देशात भारतीय आघाडीवर आहेत. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार 2011 या वर्षात भारतीयांनी सर्वाधिक म्हणजे 6400 कोटी डॉलर्स कमाई भारतात पाठवली. तर चीनच्या नागरिकांनी 6200 कोटी डॉलर आणि मेक्सिकोच्या नागरिकांनी 2400 कोटी डॉलर आपल्या देशात पाठवले.
बाहेरुन येणाऱ्या या पैशाला चीन आपल्या एफडीआयमध्ये दाखवतं. देशात जादा पैसा येण्याचं मुख्य कारण म्हणजे रुपयाचा घसरलेला स्तर हा होय. डॉलरचं मूल्य 46 वरुन 54 रुपये इतकं झालं..पैसे पाठवणाऱ्यांना प्रत्येक डॉलरवर आठ रुपये जास्त मिळाले. बँकांना एनआरआय डिपॉझिटवर व्याज दर निश्चित करण्याचा अधिकार मिळाल्यानंही फायदा झाला. त्यामुळं बँकांमध्ये रस्सीखेच सुरु झाली. विकसित देशात डिपॉझिटवर 2 ते 3 टक्के व्याज मिळवणाऱ्या एनआरआयना स्थानिक बँकांनी 12 टक्के व्याज देण्यास सुरुवात केली. त्याचा त्यांनी फायदा घेतला.
भारतात पैसा पाठवण्याचा दर वाढतच राहणार हे सांगणं कठीण आहे. कारण अमेरिका आणि युरोपात आलेल्या मंदीमुळे स्थलांतरीतांना किती रोजगार मिळाला हे सांगणं कठीण आहे. दुसरं कारण म्हणजे मंदी असलेल्या देशात इतर देशातल्या नागरिकांसाठी नोकरीच्या अटीही कडक करण्यात आल्या आहेत. युरोपमध्ये परिस्थिती सुधारली नाही तर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आखाती देशात काम करणाऱ्या भारतीयांच्या उत्पन्नात घट होईल. त्याचा परिणाम फोरेक्स इनफ्लोमध्ये दिसू शकतो. तज्ज्ञांच्या मते चलनाच्या किंमतीत चढउतारामुळे इनफ्लोवर परिणाम होऊ शकतो. सध्या तरी डॉलरची स्थिती फायदेशीर आहे.
सध्या देशात एफडीआय आणि एफआयआयद्वारे विदेशी पैसा येण्याचा वेग कमी झालाय. अशात अनिवासी भारतीयांकडून देशात येणाऱ्या पैशांचं प्रमाण भलेही कमी असलं तरी आर्थिक समतोल राखण्यासाठी हा पैसा नक्कीच फायदेशीर ठरतोय.