बॉम्बस्फोटानं जग हादरलं

प्रथम जॉर्जियामध्ये बॉम्बस्फोट झाला, या घटनेला २४ तास उलटायच्या आत दिल्लीत इस्त्रायली दूतावासाच्या गाडीत स्फोट झाला आणि त्यानंतर आज थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एकामागून एक तीन बॉम्बस्फोट झालेत. इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा हा परिणाम असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Updated: Feb 14, 2012, 07:43 PM IST

www.24taas.com, बॅंकॉक, नवी दिल्ली

 

 

गेल्या ३६ तासांत जगाच्या वेगवेगळ्या भागात बॉम्बस्फोटांच्या तीन घटना घडल्यात. जागतिक दहशतवादाचं एक भयानक चित्र या घटनांमुळं उभं राहिलंय. प्रथम जॉर्जियामध्ये बॉम्बस्फोट झाला, या घटनेला २४ तास उलटायच्या आत दिल्लीत इस्त्रायली दूतावासाच्या गाडीत स्फोट झाला आणि त्यानंतर आज थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एकामागून एक तीन बॉम्बस्फोट झालेत. इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा हा परिणाम असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

 

 

जॉर्जिया आणि दिल्लीनंतर आज थायलंडची राजधानी बँकॉक बॉम्बस्फोटांनी हादरली. बँकॉकमध्ये एकामागून एक तीन बॉम्बस्फोट झाले. हे तिन्ही स्फोट कमी तीव्रतेचे असल्याची माहिती बँकॉक पोलिसांनी दिलीय. पहिला स्फोट एका टॅक्सीत झाला. या स्फोटात एक परदेशी व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. याच व्यक्तीच्या हातात ग्रेनेड असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या स्फोटांमध्ये कुणीही मृत्युमुखी पडलं नसल्याची माहिती आहे.

 

 

एका इराणी नागरिकाने दोन ठिकाणी स्फोट घडवून आणल्याचा दावा बँकॉक पोलिसांनी केला आहे. वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणी नागरिक बॉंब घेऊन जात असताना स्फोट झाला. घटनास्थळी त्याचे ओळखपत्र सापडले आहे. एक स्फोट बॅंकॉकमधील व्यावसायिक व पर्यटन क्षेत्राच्या बाहेर तर दुसरे स्फोट रस्त्यावर झाले आहेत. या स्फोटात कोणीही मृत्युमुखी पडल्याचे वृत्त नाही. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, चौकशी करत आहेत.