ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारींची भीतीने गाळण उडाली होती. त्यामुळेच मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या दोषींना भारताच्या हवाली करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. यात हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्यांनाही भारताच्या सुपूर्द करण्याची त्यांची तयारी होती. तसंच अमेरिकेला अनुकूल असलेली नवी सुरक्षा टीम स्थापण्यास झरदारी तयार होते.
झरदारी यांनी अमेरिकेच्या लष्कराचे संयुक्त प्रमुख ऍडमिरल माईक मुल्लेन यांना पाठवलेल्या एका गुप्त पत्रामध्ये हे वचन दिलं होतं. झरदारी यांनी मन्सूर इजाझ या पाकिस्तानी अमेरिकन व्यावसायिकाच्या हस्ते हे गोपनीय पत्र मुल्लेन यांना मे महिन्यात पाठवलं होतं. ओसामा बिन लादेन यांचा अमेरिकन सील कमांडोनी खातमा केल्यानंतर हे पत्र पाठवण्यात आलं होतं. या गोपनीय पत्रासंदर्भातला गौप्यस्फोट स्वत: इजाझ यांनी फायनानशिअल टाइम्सच्या संपादकीय पानावर केला होता. इजाझ यांनी या पत्राचा मसुदा पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत हुसैन हक्कानी यांनी तयार केल्याचा दावा केला आहे. हुसैन हक्कानी यांनी हा दावा फेटाळला असला तरी त्यांनी आपला राजीनामा झरदारींकडे पाठवला आहे. झरदारी यांना नवं राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा उभारयाची होती असा या पत्रात नमूद करण्यात आलं.