पाकिस्तानी मदरशातून बंदिस्त मुलांची सुटका

पाकिस्तानात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं ही गोष्ट पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. कराची येथील एका इस्लामी मदरशाच्या तळघरात ५० हून अधिक मुलं व तरुण साखळदंडांनी बांधून ठेवले असल्याचं आढळून आलं.

Updated: Dec 13, 2011, 03:38 PM IST

झी २४ तास वेब टीम, कराची

 

पाकिस्तानात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं ही गोष्ट पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. कराची येथील एका इस्लामी मदरशाच्या तळघरात ५० हून अधिक मुलं व तरुण साखळदंडांनी बांधून ठेवले असल्याचं आढळून आलं. या सर्वांना तालिबानकृत दहशतवादी कारवाया करण्य़ासाठी प्रशिक्षण देण्यासाठी आणलं गेलं होतं. यातून सोडवून आणलेली बहुतांश मुलं ही १२ वर्षांची आहेत. त्यातलीही अधिकतर मुलं ही पख्तुन प्रांतातली आहेत.

 

पाकिस्तानी पोलिसांनी सोमवारी कराचीमधल्या सोहराब गोठ या भागात धाड घालून या मुलांना सोडवलं. या सर्व मुलांना मदरशाच्या तळघरात साखळदंढांनी बांधून ठेवण्यात आल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. या मुलांची तब्येत बिघडली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या मुलांनी तालिबानमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला, त्या मुलांना उलटं लटकवण्यात आलं होतं.

 

 बहुतांश बंदिवान मुलं ही पख्तुन प्रांतातून आणली गेली होती. एका मुलाने सागितलं, “तालिबानचे काही सदस्य आमच्या शाळेत आले होते आणि आम्हाला युद्धास तयार राहा असं ते म्हणाले.”

 

पाकिस्तानच्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की या मुलांना अवैध आणि दुष्कृत्यांसाठी तयार करण्यात येणार होतं. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ज्या मदरशामधून ही मुलं सोडवण्यात आली, त्या मदरशाचा तालिबानशी काही संबंध आहे का याचीही पडताळणी करण्यात येईल. या प्रकरणाची गांभीर्याने चर्चा व्हावी, यासाठी धार्मिक शाळांच्या प्रमुखांची बैठक बोलवण्यात आली आहे.