परराष्ट्रमंत्र्यांचं पाकला आवाहन

भारतीय कैदी सरबजीत सिंगला पाकनं सोडून द्यावं, अशी मागणी आज भारत सरकारनं पाकिस्तानकडे केलीय.

Updated: Jun 27, 2012, 02:49 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

भारतीय कैदी सरबजीत सिंगला पाकनं सोडून द्यावं, अशी मागणी आज भारत सरकारनं पाकिस्तानकडे केलीय.

 

सरबजीत सिंग याला तुरुंगातून सोडणार असल्याची बातमी काल दुपारी आली होती. पाकिस्तानी चॅनल्सनं काल रात्री उशीरापर्यंत सरबजीतच्या सुटके संबंधितच बातम्या चालवल्या. भारताचे परदेशमंत्री एस. एम. कृष्णा यांनीही सरबजीत सिंगला सोडणार असल्याच्या बातमीवरुन पाक राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना धन्यवाद दिले होते. पण रात्री उशीरा मात्र पाकनं पलटी मारली आणि आपण सरबजीत सिंगची नाही तर सुरजीत सिंगची सुटका करत असल्याचं पाकनं स्पष्ट केलं.

 

पाक राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते फरहतुल्ला बाबर यांनी ही माहिती दिली. यावर कृष्णा यांनी सुरजीतला सोडून देण्याच्या पाकच्या निर्णयाचं स्वागत केलंय पण त्याचसोबत सरबजीतलाही सोडण्याची मागणी त्यांनी यावेळी केलीय. याआधीही कित्येक वेळा भारतानं सरबजीत सिंहच्या बाबतीत सहानुभूतिपूर्वक विचार केला जावा, तसंच ज्यांनी आपली सजा पूर्ण केली असेल अशा सर्व पाक तुरूंगातील भारतीय नागरिकांना सोडून देण्याची विनंती, यावेळी कृष्णा यांनी केली.

 

काल रात्री उशारी पाक राष्ट्रपतींचे प्रवक्ते फरहतुल्ला बाबर यांनी अशा कुठल्याही प्रकारच्या निर्णयाचा राष्ट्रपतींशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय. ‘हा काही माफी देण्यालायक खटला नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही व्यक्ती सरबजीत सिंह नूसन सुरजीत सिंह आहे. सुरजीतनं जन्मठेपेची शिक्षा पूर्ण केली आहे. म्हणून त्याला भारतात परत पाठवलं जातंय’ असं स्पष्टीकरण बाबर यांनी यावेळी दिलं.

 

.