www.24taas.com, अक्रा, घाना
घानाचे राष्ट्रपती जॉन अता मिल्स यांचं मंगळवारी सैनिकी हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. आजारी पडल्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झालाय.
जॉन मिल्स यांचं निधन नक्की कोणत्या कारणामुळे झालं यावर मात्र अद्याप कुठलिही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. ‘स्वतंत्र घानाचे राष्ट्रपती जॉन मिल्स यांच्या अकाली मृत्यूची दु:खद मनानं आम्ही ही घोषणा करतोय’ अशी घोषणा 'चीफ ऑफ द स्टाफ ऑफ द प्रेसीडेन्सी' हेन्री मार्टेन यांनी केली. मिल्स यांची तब्येत ढासळल्यानंतर त्यांना ताबडतोब सैनिकी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं.
पश्चिम आफ्रिकी राष्ट्र असलेल्या घानाचे राष्ट्रपती जॉन मिल्स हे ६८ वर्षांचे होते. मिल्स यांनी जानेवारी २००९मध्ये सत्ता हातात घेतली होती. तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन स्वास्थ चिकित्सा केली होती. २५ जून रोजी ते अमेरिकेतून मायदेशात परतले होते. संविधानानुसार आता त्यांच्या जागी सध्याचे उपराष्ट्रपती जान द्रमानी राष्ट्रपतीपदावर म्हणजेच देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील.
.