www.24taas.com, अंटार्क्टिका
शास्त्रज्ञांना अंटार्क्टिकाजवळील समुद्रातळाशी एका नवीन प्रजातीची माहिती मिळाली आहे. ही प्रजाती उबदार, अंधाऱ्या वातावरणात समुहाने राहाते. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड, नॅशनल ओशनोग्राफी सेंटर आणि ब्रिटीश अंटार्क्टिक सर्व्हेच्या शास्त्रज्ञांनी खेकडे, स्टारफिश, शिंपले, समुद्री रत्नज्योती आणि ऑक्टोपस यांच्या अशा प्रजाती पाहिल्या. या प्रजाती विज्ञानाला संपूर्णतः नवीन होत्या.
प्रथम शास्त्रज्ञांनी ‘रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल’च्या (आरओव्ही) सहाय्याने महासागराच्या तळाशी असलेल्या पूर्वेकडील 'स्कोशिया रिज' या घळीचा तपास केला. इथल्या काही भागांत छिद्रं असून त्यात गरम पाण्याचे झरे असल्याचं लक्षात आलं. या झऱ्यांचं तापमान ३८२ अंश सेल्सियस एवढं होतं. या छिद्रांपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही, मात्र इथे काही खास रसायनं असल्याचं मोठ्या प्रमाणावर आढळून आलं आहे.
शास्त्रज्ञांचे यासंदर्भातील रिपोर्ट्स ‘पीएलओएस बायोलॉजी’ या साप्ताहिकाच्या यंदाच्या अंकात प्रकाशित झाले आहेत. आरओव्हीतून असे काही फोटोही मिळाले आहेत ज्यात नव्या जातीचे खेकजे मोठ मोठ्या समुहाच्या रुपाने राहात असल्याचं दिसून येतं.