www.24taas.com, श्रीनगर
श्रीनगरच्या एकमेव मुलींच्या रॉक बॅन्डनं आता यापुढे कधीच गाणं न गाण्याचा निर्णय घेतलाय. सध्या भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या या मुलींनी कट्टर धर्मियांच्या धमक्यांपुढे नमतं घेत ‘आम्ही यापुढे कधीच गाणार नाही पण आम्हाला एकटं सोडा’ अशी विनवणी केलीय.
याच बॅन्डचा एक भाग असणाऱ्या एका मुलीशी संवाद साधला असता, ‘आम्हाला आमचं संगीत पुढे सुरु ठेवण्याची इच्छाच राहिली नाही आम्ही संगीताला इथंच पूर्णविराम देत आहोत. मला व्यक्तिश: हे माहित नाही की संगीत गैर इस्लामिक आहे किंवा नाही पण मुफ्ती याबद्दल जास्त माहित असावं. आम्ही मुफ्तींचा आदर करतो. त्यामुळे आम्ही त्यांनी घेतलेला निर्णयही मानतो. त्यामुळे आम्ही आमचा रॉक बॅन्ड बंद करण्याचा निर्णय घेतलाय’ असं तिनं म्हटलंय. पुढे ती म्हणते, ‘जर कुणाला संगीतक्षेत्रात आपलं करिअर घडवायचं असेल तर त्याच्यासाठी काश्मीर ही योग्य जागा नाही. त्यासाठी त्यांना इथून बाहेर पडावं लागेल’.
तुमच्या बॅन्डमधील मुली सुरक्षित आहेत असं वाटतंय का? या प्रश्नावर तीनं ‘आम्हाला कोणतीच सुरक्षा नकोय. फक्त आम्हाला एकटं सोडा’ असं म्हणत आपला त्रागा व्यक्त केला.
कश्मीरमधला एकमेव मुलींचा रॉक बॅन्ड असलेल्या `प्रगाश` या बॅन्डमध्ये गिटारिस्ट नोमा नझीर, ड्रमर फराह डिबा आणि गिटारिस्ट अनिका खालिद या तीनही इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुली आहेत. डिसेंबर महिन्यात श्रीनगरमध्ये झालेल्या ‘बॅटल ऑफ द बॅन्ड’ या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये या मुलींनी पहिल्यांदाच भाग घेतला होता. त्यावेळी संपूर्ण खोरं आपल्या आवाजानं त्यांनी दणाणून सोडलं होतं. पण, त्याचं हे पाऊल मात्र अल्पवयीन ठरलं. त्यांना सोशल नेटवर्किंग साईटवरून धमकी देण्यात आली. सर्वोच्च मुल्ला बशिरूद्दीन अहमद यांनी मुलींनी गाण्याला गैरइस्लामिक म्हटले आहे आणि त्याविरोधात फतवाही जारी केलाय. त्यानंतर समाज आणि घरातून झालेल्या विरोधामुळे या मुलींनी संगीतालाच राम-राम ठोकण्याचा निर्णय घेतलाय.
‘धर्माच्या नावाखाली इथं काहीही खपवलं जातंय. तुम्हाला गाणं पसंत नसेल तर तुम्ही तुमचे कान बंद करा. या मुलींना धर्माच्या नावाखाली रोखणं, ही काही योग्य गोष्ट नाही’असं म्हणत भाजपच्या खासदार नजमा हेपतुल्लाह यांनीही मुलींच्या बँन्डला पाठिंबा दर्शविलाय. तसंच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता शर्मा यांत्री मात्र यावर जोरदार आक्षेप घेतलाय. ‘हे चुकीचं आहे. प्रत्येकाला आपले आपले स्वतंत्र विचार आहेत. परंपरा आहेत... मात्र, स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतरही मुलींना एखादं काम करण्यापासून रोखलं जातंय आणि आपण काहीही पाऊल उचलत नाही, हा आपला दुटप्पीपणा आहे’ असं त्यांनी म्हटलंय.