नवी दिल्ली : परदेशात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुशखबर दिलीय. कोणत्याही विवाहीत महिलेला यापुढे पासपोर्ट काढण्यासाठी विवाह किंवा घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं प्रंतप्रधानांनी जाहीर केलंय.
आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलंय. इंडियन मर्चंट चेम्बर्सच्या महिला शाखेला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते.
पासपोर्टच्या नियमांत बदल केले जात आहेत. त्यामध्ये, कोणत्याही विवाहीत महिलेला आता पासपोर्ट काढण्यासाठी आपल्या पतीच्या नावाची गरज भासणार नाही... महिलांना आपल्या विवाहाचे किंवा घटस्फोटाचे कागदपत्रं पासपोर्टसाठी सादर करण्याची गरज नाही.
शिवाय लग्नाअगोदरही ही सर्वस्वी त्या महिलेची इच्छा असेल की तिला तिच्या पासपोर्टवर आपल्या वडिलांचं नाव लिहायचंय की आईचं...
सध्याच्या नियमांनुसार, महिलांना विवाहानंतर पासपोर्टवर आपलं नाव बदलावं लागतं. त्यासाठी अनेकदा पासपोर्ट कार्यालयात फेऱ्याही माराव्या लागतात. शिवाय, वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर त्यामुळे अनेक अडथळ्यांना महिलांना सामोरं जावं लागतं. मोदी सरकारच्या या नव्या निर्णयाचा परदेशी दौरा करणाऱ्या किंवा तशी इच्छा असणाऱ्या महिलांना नक्कीच फायदा होणार आहे.