www.24taas.com, हैदराबाद
आपल्या देशाला स्वातंत्र्य मध्यरात्री मिळाले. याचा अर्थ घेवून महिलांनी रात्रभर रस्त्यावर भटकायचे काय, असा सवाल केला आहे आंध्रप्रदेशमधील काँग्रेसचे परिवनह मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी.
नवी दिल्लीत रात्री खासगी बसमध्ये २३ वर्षीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यामुळे दिल्लीसह देशात चिड व्यक्त होत आहे. युवकांनी आंदोलन करताना आरोपींना फाशी लटकवा, अशी मागणी केली आहे. गेले तीन दिवस दिल्लीत उग्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे सरकारही हतबल झाले. उशीरा का होईना सरकार जागे झाले आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
बलात्काराची घटना क्षुल्लक बाब होती. त्या रात्री खासगी बसमध्ये चढताना संबंधित तरुणीने खबरदारी घ्यायला हवी होती. देशाला मध्यरात्री स्वातंत्र्य मिळालं याचा अर्थ महिलांनी रात्री फिरायलाच पाहिजे असं नाही. त्यांनी रात्री बाहेर पडणं म्हणजे संकटाला निमंत्रण देण्यासारखेच आहे, अशी बडबड काँग्रेसच्या या मंत्र्यांनी केलीय.
दिल्लीतील या घटनेविरोधात निदर्शने करणा-यांवरही सत्यनारायण यांनी टीका केली. सोनिया गांधी यांनी आंदोलनाची दखल घेत कारवाईबाबत आश्वासन दिले आहे. त्यामुळे रस्त्यावरील सगळी निदर्शने थांबली पाहिजेत, असे सत्यनारायण म्हणालेत.
दिल्लीतील पडसादानंतर काँग्रेसच्या मंत्र्याने वादग्रस्त विधान केल्याने काँग्रेस पक्ष अडचणीत सापडलाय. परिवनह मंत्री बोत्सा सत्यनारायण यांच्या विधानामुळे आता काँग्रेस काय उत्तर देणार की सत्यनारायण यांना तंबी देणार याची उत्सुकता लागली आहे. सत्यनारायण हे प्रेदश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानावर वादळ उठण्याची शक्यता आहे.