www.24taas.com, झी मीडिया, डेहराडून
उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांची घरे वाहून गेली आणि अनेकांचे संसारही उद्ध्वस्त झाले आहे. गाळात अडकलेल्या पतीच्या मृतदेहाजवळ तब्बल दोन दिवस बसून राहण्याची वेळ उत्तरप्रदेशातील रहिवासी सविता नागपाल यांच्यावर आली.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील असलेल्या सविता नागपाल या पती सुरेंद्र नागपाल यांच्यासोबत बद्रिनाथ यात्रेसाठी गेल्या होत्या. ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते, तेच हॉटेल सोमवारी रात्री पुरात वाहून गेले. तेव्हा ते दोघेही जीव वाचवून रस्त्यावर धावत आले. पण, सुरेंद्र नागपाल हे गाळात अडकले आणि त्यांचा तेथेच मृत्यू झाला. त्यावेळी यांच्या बचावासाठी कोणीच नसल्याने सविता नागपाल या तेथेच दोन दिवस बसून राहिल्या.
सविता नागपाल यांचा मुलगा मुकेश याला मंगळवारी रात्री वडिलाच्या मृत्यूची बातमी वाहिन्यांवरून समजल्यानंतर त्याने घटनास्थळी पोहचण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्याला अपयश येत होते. त्याने उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचा मुलगा साकेत याच्याकडे मदतीची मागणी केली. तेव्हा लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून जोशीमठ परिसरात त्याची आई वडिलांच्या मृतदेहाजवळ बसल्याचे दिसून आले. पतीच्या मृत्युमुळे धक्का बसलेल्या सविता नागपाल यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले आणि तेथेच सुरेंद्र नागपाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.