हाथरस, उत्तर प्रदेश: एक तरुण मुलगी आणि तिच्या मित्राला ६ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलीय. जवळपास १० मिनीटं ही मारहाण सुरू होती. भामट्यांनी या प्रकाराचा व्हिडिओही मोबाईलवर शूट केला आणि व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ टाकलाय.
१३ मार्चला ही धक्कादायक घटना हाथरसमध्ये घडली. पीडित मुलीनं दिलेल्या माहितीनुसार ती आणि तिचा मित्र बाजारात जात असतांना सहा जणांनी त्यांना जबरदस्तीनं पकडलं आणि निर्जन स्थळी नेलं. तिथं जोडप्याला सर्वांनी शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली.
पीडित सांगते, 'ते आम्हाला सतत मारत होते. मी वारंवार त्यांच्याकडे आम्हाला सोडण्याची विनंती करत होती. पण ते गैरवर्तन करतच राहिले आणि माझं नाव घेत मारहाण, शिवीगाळ सुरू ठेवली.'
काही वेळानंतर त्या बाईकस्वार भामट्यांनी दोघांना तिथंच सोडून देत शहराकडे पोबारा केला. रिपोर्टनुसार हल्लेखोर मुलीच्या गावातील तरुणच होते. सहा पैकी एका मुलाचं तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं.
पोलिसांनी या प्रकरणी चौघांना पकडलं असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. यापूर्वीही महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात अशाचप्रकारची घटना घडली होती. काही असामाजिक तत्त्वांनी जोडप्याला बेदम मारहाण करून त्याचा व्हिडिओ फेसबुकवर टाकला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.