रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: व्यापमं घोटाळ्यामुळं भाजपची प्रतिमा मलिन होऊ लागलीय. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चिंता लागून राहिलीय. याबाबत लोकांच्या मनात नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आरएसएस मध्य प्रदेशात सर्वेक्षण करतंय.
व्यापम घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांमुळं आधीच भाजपचं कंबरडं मोडलंय. त्यात एकापाठोपाठ एक 45 जणांच्या मृत्यूचं गूढ अद्याप उकललेलं नाही. या घोटाळ्याला भाजप सरकार जबाबदार असल्याचा सूर काँग्रेसनं आळवलाय. या आरोपानंतर मध्य प्रदेशातल्या लोकांच्या मनात सरकारविषयी काय भावना आहेत, हे जाणून घेण्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघच मैदानात उतरलाय. आरएसएस मध्य प्रदेशात एक सर्वेक्षण करतंय.
- संघातील काही ज्येष्ठ नेते भाजप आणि संघाच्या अन्य संघटनांतील लोकांचे मत जाणून घेतायत
- संघाची एक टीम सोशल नेटवर्किंग साइटवरील लोकांच्या कमेंट आणि चर्चेवरही नजर ठेवून आहे
- सरसंघचालक मोहन भागवत हे भोपाळमध्ये जाऊन या सर्वेक्षणाची माहिती घेणार आहेत
- भागवत यांच्या उपस्थितीत रविवारी संघाची बैठक होणाराय. यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, प्रदेश भाजप अध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान आणि महामंत्री अरविंद मेनन उपस्थित असतील
एकीकडं काँग्रेसनं शिवराजसिंह चौहान यांचा राजीनामा मागितलाय. तर उमा भारतींसारखे स्वपक्षीय नेतेही चौहान यांच्याविरोधात राजकीय पोळी भाजून घेतायत. आरएसएसच्या या सर्वेक्षणात आता काय हाती लागतंय, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.