www.24taas.com, नवी दिल्ली
भारताशी हेलिकॉप्टर खरेदीचा करार व्हावा यासाठी ‘ऑगस्टावेस्टलँड’ या इटलीतील कंपनीनं जेवढे वापरता येतील तेवढ्या सगळ्या पद्धतींचा वापर केला गेला. प्रकरणातले एक मुख्य आरोपी असलेले तत्कालीन हवाई दलाचे प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आणि व्यवहार सुरळीत व्हावा यासाठी दलालांनी पैशांसोबत `स्त्रियांचा’ही वापर केला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
संरक्षण मंत्रालयानं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. इटलीमधल्या फिनमेकॅनिका या कंपनीची अगस्ता वेस्टलँड जातीच्या विमानांची ही खरेदी झाली होती. कंपनीच्या सीईओला या प्रकरणी ३५० कोटी रुपयांच्या दलाली प्रकरणी अटक झालीये. एका इटालीयन कंपनीक़डून १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची खरेदी करण्यासाठी लाचखोरी केल्याचा माजी हवाईदल प्रमुख एस.पी. त्यागी यांच्यावर आरोप आहे. त्यागी यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी केवळ पैशांचाच नाही, तर स्त्रियांचाही वापर केला गेला, अशी माहिती आता समोर येतेय. इटलीतील वकिलांनी जमा केलेल्या कागदपत्रांतून ही माहिती समोर आलीय.
त्यागी यांचे नातेवाईक जूली, डोस्का आणि संदीप यांची ओळख मध्यस्ती म्हणून इटलीतील अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात नमूद करण्यात आलंय. या कामासाठी त्यागी यांच्या नातेवाईकांना ७० लाख रुपयांची लाच देण्यात आली तर उरलेली रक्कम आयडीएस इंडिया नावाच्या कंपनीतील सर्विस कॉन्ट्रॅक्टद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली, असेही यावेळी सांगण्यात आले.
दलालांच्या मैत्रिणींच्या मदतीने त्यागी यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला. विशेषकरून जूली त्यागी हिच्याशी... कारण दलालीची रक्कम जूलीला देण्यात आलेली होती. त्यागी परिवारातील सदस्य आणि कंपनीत २००१ सालात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. जेव्हा कार्लो गेरोसा हा इटलीतील एका लग्नात जूलीला भेटला होता. याच काळात भारतीय हवाई दलाने भारतील महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींसाठी हेलिकॉप्टरची मागणी समोर ठेवली होती.
जेव्हा ‘ऑगस्टावेस्टलँड’ या कंपनीला आपण व्यवहारातून बाहेर फेकले जात आहोत अशी शंका आली त्यावेळी कंपनीने कार्लो आणि त्याचा बॉस राल्फ यांच्याशी संपर्क साधला. हे दोघेही त्यागी यांच्या नातेवाईकांना चांगले ओळखत होते. खरे तर १८००० फूट उंचीवरून उडणारी हेलिकॉप्टर व्हीआयपींसाठी हवी आहेत अशी अट होती. मात्र, टेंडरमध्ये अचानक बदल करून तो १५००० फूट उंचीवरून उडणारी हेलिकॉप्टर हवी अशी अट करण्यात आली. याचा फायदा ऑगस्टावेस्टलँड या कंपनीला झाला आणि त्यांच्याशी व्यवहार करण्यात आला. २००५ ते २००७ या कालावधीत त्यागी हवाई दलाचे प्रमुख होते तेव्हा दलालाने त्यांची कमीत कमी सहा वेळा भेट घेतली. दोन वेळा त्यांच्या नातेवाईकांच्या ऑफिसमध्ये तर एकदा बंगळुरु येथील ‘एअर शो’च्यावेळी, ज्याचे आयोजन दर दोन वर्षांनी केले जाते.