होय, मी लोकसभा निवडणूक लढणार - खोब्रागडे

निवृत्त आयएएस अधिकारी आणि भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 15, 2014, 07:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
निवृत्त आयएएस अधिकारी आणि भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलीय.
‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उत्तम खोब्रागडे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं म्हटलंय. ‘यामध्ये काहीही नवीन नाही. मी निवृत्त झाल्यानंतर सक्रीय राजकारणात सहभागी होणार, याची अनेकांना कल्पना होती... मी निवृत्ती स्वीकारल्यानंतर ही चर्चा जोरात सुरू झाली... आणि होय, मी लोकसभा निवडणूक लढणार’ असं खोब्रागडे यांनी यावेळी म्हटलंय.
लोकसभा निवडणूक लढणार पण, कोणत्या पक्षातून? या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी अद्याप गुलदस्त्यातच ठेवलंय. ‘वेगवेगळ्या पक्षांसोबत याविषयी माझी चर्चा सुरू आहे... योग्य वेळ आल्यानंतर मी याबद्दलही घोषणा करेन’ असं त्यांनी म्हटलंय.
देवयानी आणि तिच्या कुटुंबीयांबद्दल खोब्रागडे यांना विचारलं असता ‘तिचं कुटुंब पुढच्या महिन्यात भारतात परत येईल. आम्ही तिच्या दोन मुलांचं दिल्लीतल्या शाळेत प्रवेश घेऊन त्यांचं शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय’ असं त्यांनी म्हटलंय.
उत्तम खोब्रागडे यांनी यापूर्वी ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापदीही काम सांभाळलंय. त्यावेळेपासूनच ते राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.