‘लैंगिक शिक्षण हवं, पण बिभत्सता नको’

शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन किती गरजेचं आहे? त्यामुळं महिलांवरील अत्याचार कमी होतील, की ज्या देशांमध्ये सेक्स एज्युकेशन दिलं जातंय, त्या देशांसारखं भारतातील मुलांमध्येही लैंगिंक संबंधांना चालना मिळेल? असे अनेक गहन प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत. कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या भूमिकेमुळं पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलंय.

Updated: Jun 28, 2014, 03:54 PM IST
‘लैंगिक शिक्षण हवं, पण बिभत्सता नको’ title=

नवी दिल्ली : शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन किती गरजेचं आहे? त्यामुळं महिलांवरील अत्याचार कमी होतील, की ज्या देशांमध्ये सेक्स एज्युकेशन दिलं जातंय, त्या देशांसारखं भारतातील मुलांमध्येही लैंगिंक संबंधांना चालना मिळेल? असे अनेक गहन प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत. कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या भूमिकेमुळं पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलंय. या वादानंतर त्यांनी पुन्हा एकदा सारवासारव केलीय. लैंगिक शिक्षण गरजेचं आहे, पण त्यात बिभत्सपणा असता कामा नये, असा खुलासा त्यांनी केलाय. 

शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन दिलं पाहिजे? सेक्स एज्युकेशनमुळं फायदा की नुकसान? कोणत्या वयातल्या विद्यार्थ्यांना द्यावं सेक्स एज्युकेशन? यांसारख्या मुद्यांवरून देशात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. या चर्चेला पुन्हा नव्यानं तोंड फुटलंय. कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आपल्या वेबसाइटवर आपली भूमिका मांडलीय. तथाकथित सेक्स एज्युकेशनवर बंदी घातली पाहिजे. भारतीय संस्कृतीची मूल्यं जपणारं शिक्षण दिलं पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांना योगाचे शिक्षण सक्तीचे करायला हवे, असं हर्ष वर्धन यांनी म्हटलंय.  

हा मुद्दाच वादग्रस्त असल्यानं, डॉ. हर्ष वर्धन यांच्या भूमिकेवरून नवा वाद सुरू व्हायला वेळ लागला नाही. पेशाने डॉक्टर असलेल्या आरोग्यमंत्र्यांवर चौफेर टीका होऊ लागली. या वादात भाजपचीही कोंडी झाली. काहींनी आरोग्यमंत्र्यांचं समर्थन केलं, तर काहींनी ते त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगितलं.

याआधीही कंडोमच्या वापराबाबतही हर्ष वर्धन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र, टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव केलीय. सध्या हर्ष वर्धन अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यामुळं वाद थांबणार नाहीय. भारतात परतल्यानंतर डॉ. हर्ष वर्धन सेक्स एज्युकेशनवरून पुन्हा एकदा लक्ष्य ठरणार, एवढं नक्की...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.