पंतप्रधान पदावर असतानाच झाला होता लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू...

नेताजी सुबाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंबंधीच्या काही फाईल्स उघड झाल्यानंतर आता भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूच्या फाईल्सही उघड केल्या जाव्यात अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलीय. पण, आत्ताच्या पीढिला कदाचित शास्त्रींचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला होता याची माहिती नसेलही... त्यासाठी 'त्या' घटनांना हा उजाळा....

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 30, 2015, 02:18 PM IST
पंतप्रधान पदावर असतानाच झाला होता लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू...  title=

मुंबई : नेताजी सुबाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंबंधीच्या काही फाईल्स उघड झाल्यानंतर आता भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूच्या फाईल्सही उघड केल्या जाव्यात अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलीय. पण, आत्ताच्या पीढिला कदाचित शास्त्रींचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला होता याची माहिती नसेलही... त्यासाठी 'त्या' घटनांना हा उजाळा....

शास्त्रींची कारकिर्द
लाल बहादूर शास्त्री यांनी 9 जून 1964 रोजी भारताचे दुसरे पंतप्रधान आणि तिसरे परराष्ट्रमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. 17 जुलै 1964 रोजी त्यांनी आपल्या परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर सरदार स्वर्णसिंग यांनी ही जबाबदारी स्वीकारली. 


शास्त्री आणि अयुब खान

1965 सालचं भारत-पाक युद्ध
लाल बहादूर शास्त्री यांच्याच कार्यकाळात भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुसरं युद्ध झालं होतं. हे 'काश्मीर युद्ध' भारत-पाक दरम्यानचे पहिलं हवाई युद्ध म्हणून ओळखलं जातं.

15 ऑगस्ट 1965 रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 'पाकिस्तानला भारताची एक इंचही भूमी व्यापू देणार नाही' अशी गर्जना करीत युद्धाचा शंखनाद केला. संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, या युद्धात भारतानं पाकला सळो की पळो करून सोडलं होतं. पण, या युद्धात कुणालाही निर्णायक विजय मिळाला नव्हता. या अहवालाचा काही भाग आजही अप्रकाशित आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, 1965 च्या युद्धात लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिरंगा फडकला होता. पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करीत भारताने इतिहास रचला होता. परंतु रशियाच्या मध्यस्थीने काय घडले ज्यामुळे जिंकूनही भारताला माघार घ्यावी लागली?
 
ताश्कंद करार आणि शास्त्रींचा मृत्यू 
1960 पर्यंत सोव्हिएत युनियन भारताचा सर्वात मोठा लष्करी सामग्री पुरवणारा देश होता. 1965 च्या युद्धानंतर 10 जानेवारी 1966 रोजी रशियाच्या मध्यस्थीनं भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकचे जनरल अयुब खान यांच्यात ताश्कंदमध्ये (तत्कालीन सोव्हियत संघ, आत्ताचा उझबेकिस्तान) एक बैठक पार पडली. या बैठकीत पाकचा 710 चौकिमीचा प्रदेश भारताला तर भारताचा 210 चौकिमी प्रदेश पाकला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधिक वाचा - `अॅपल` सोडून लाल बहादूर शास्त्रींचा नातू `आप`मध्ये!

या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 11 जानेवारी 1966 रोजी शास्त्रींचा ताश्कंदमध्ये संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराचे दोन झटके आल्यानं झाल्याचा पहिल्यांदा सांगितलं गेलं.


शास्त्री आणि त्यांच्या पत्नी ललिता

विषप्रयोगासाठी स्वयंपाक्याला अटक आणि सुटका
शास्त्रींचं शरीर पालम विमानतळावर (आत्ताचं दिल्ली विमानतळ) आणला गेला तेव्हा त्याचं शरीर काळंनिळं पडलं होतं... असं शास्त्रींच्या कुटुंबाचं म्हणणं होतं. शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा आरोपही त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी केला. यानंतर, शास्त्रींच्या रशियन स्वयंपाक्याला त्यांच्यावर विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली.

मृत्यूचं कारण उघड न करण्याची सरकारची भूमिका
2009 साली अरूण धर यांनी माहितीच्या अधिकाराखाली पंतप्रधान कार्यालयाकडे शास्त्रींच्या मृत्यूचे कारण जाहीर करण्याची विनंती केली. पण पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती फेटाळून लावली. 'यामुळे आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता, देशात हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता आणि संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो' अशी यात कारणं देण्यात आली होती. पंतप्रधान कार्यालयाने शास्त्रींच्या मृत्यूबाबत एक दस्ताऐवज आपल्याकडे आहे... हा दस्तऐवज नष्ट किंवा गहाळ झालेला नाही, मात्र तो उघड करता येणार नाही, अशी घेतली. 

भारतानं शास्त्रींच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम केलं?
शास्त्रींचे वैयक्तिक डॉक्टर आर. एन. चुग आणि काही रशियन डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचा अहवाल आपल्याजवळ असल्याचं सोव्हियत रशियानं मान्य केलं होतं. मात्र त्याचवेळी शास्त्रींच्या मृत्यूनंतर त्यांचा पोस्टमॉर्टेम केलं नसल्याचंही त्यांनी मान्य केलं, असं पंतप्रधान कार्यालयानं नमूद केलंय. पण, भारतानं शास्त्रींच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम केलं किंवा नाही याची माहिती अद्याप गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

शास्त्रींच्या मृत्यूचे 'ते' दोन साक्षीदार
ज्या दिवशी शास्त्रींचा मृत्यू झाला त्यावेळी दोन साक्षीदार प्रत्यक्षात हजर होते... एक म्हणजे डॉ. आर एन चुग आणि दुसरा म्हणजे शास्त्रींचा नोकर राम नाथ... 

1977 मध्ये संसदेच्या एका समितीसमोर हजर होण्याअगोदरच डॉ. चुग यांना एका ट्रकनं धडक दिली. यात डॉ. चुग यांचा मृत्यू झाला 

तर शास्त्रींच्या मृत्यूनंतर राम नाथ शास्त्रींच्या घरी गेले तेव्हा आपल्याला या मृत्यूबद्दल काहीतरी माहीत असल्याचा इशारा दिला होता. शास्त्रींच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार राम नाथनं 'बहुत दिन का बोझ था, अम्मा... आज सब बता देंगे' असं म्हटलं होतं... आणि त्यानंतर काही वेळातच राम नाथला एका कारनं धडक दिली. या अपघातात त्यांचे दोन्ही पाय निकामी केलेच पण सोबतच त्यांनी स्मृतीही गमावली.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.