नक्षलहल्ल्याच्या वेळी गृहमंत्री `बिझी` होते!

छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ल्याची बातमी समजल्यानंतरही तब्बल चार दिवसांनी भारतात परतलेल्या केंद्रीय सुशीलकुमार शिंदे यांनी डॉक्टरांचं कारण पुढे करत आपण त्यावेळी अमेरिकेत बिझी होतो असं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 31, 2013, 04:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ल्याची बातमी समजल्यानंतरही तब्बल चार दिवसांनी भारतात परतलेल्या केंद्रीय सुशीलकुमार शिंदे यांनी डॉक्टरांचं कारण पुढे करत आपण त्यावेळी अमेरिकेत बिझी होतो असं म्हटलंय.
पुण्यासह देशभरातील महत्त्वाच्या शहरांना नक्षलवादी हल्ल्याचा धोका असल्याचं अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिले असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीय. नक्षलवादी हल्ल्यानंतर चार दिवसांनी मायदेशी परतलेल्या शिंदे यांनी अमेरिका दौरा लांबविण्यामागे वैद्यकीय कारण असल्याचंही म्हटलंय. भीषण दहशतवादी हल्ला होऊनही शिंदे यांनी अमेरिका दौरा पुढे चालूच ठेवल्याने भारतीय जनता पक्षासह अनेकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती.

‘यासंदर्भात मी निवेदन प्रसिद्ध करण्याची गरज नव्हती. सर्व संबंधितांच्या मी संपर्कात होतोच. २३ मे नंतरही अमेरिकेत थांबण्याची मी पूर्वपरवानगी घेतली होती. तेथे डोळ्यांच्या जगप्रसिद्ध डॉक्टरांशी २८ मे रोजी माझी भेट ठरली होती. वैद्यकीय कारणासाठी माझा दौरा वाढविला होता’ असं कारण केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलंय. महेंद्रसिंह कर्मा यांच्यावर नक्षलवादी हल्ला करणार आहेत, याची पूर्वकल्पना मिळाली नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी आज सुशीलकुमार शिंदे भेट देणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.