www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्र सरकारची आधार कार्ड योजना प्रत्येक वेळेस नव्या नव्या वादांत अडकताना दिसतेय. आता वाद सुरू झालाय तो कपड्यांवरून... होय, म्हणजे तुम्हाला आधार कार्ड काढायचं असेल तर फोटो काढण्यासाठी केंद्रावर जाताना तुम्ही कसे कपडे घालावेत याबद्दल... आणि हे फतवे स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही लागू होतात, बरं का…
नुकतंच या आधारच्या ड्रेसकोडसनं सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालताय. काही महिलांनी ट्विटरवर ट्विट केलंय, की आधारकार्ड बनविण्यासाठी केंद्रांवर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना घरी परत पाठवलं कारण त्यांनी ओढणी घेतलेली नव्हती.
सरकारतर्फे अनेक ठिकाणी आधार कार्ड बनवून घेण्यासाठी विविध ठिकाणी कॅम्प आयोजित केले जात आहेत. या कॅम्प्समध्ये नागरिकांचे पासपोर्ट साईजचे फोटो, डोळ्यांचे स्कॅनिंग, हाताचे तसंच बोटांचे ठसे घेतले जातात. परूंत सांस्कृतिक साम्राज्यवाद या योजनेवरही परिणाम करताना दिसतोय. याबद्दल सांगताना लावण्यानं ट्विट केलंय की, ‘फोटो काढण्यासाठी मी एक तासभर रांगेत उभी राहिले. जेव्हा नंबर आला तेव्हा अधिकाऱ्यानं मला जवळजवळ तिथून हाकललंच कारण मी ड्रेसवर ओढणी घेतलेली नव्हती’... यावर लावण्याच्या ट्विटवर प्रतिक्रिया देतानाच श्रद्धानं आपला अनुभव कथन केला. ती म्हणते, ‘मला तर केवळ यासाठी परत पाठवलं कारण माझी ओढणी पारदर्शक होती’.
फक्त महिलांनाच हा अनुभव येतोय असं नाही, कारण ज्या पुरुषांनी टी शर्ट परिधान केलं होतं त्यांनाही नोंदणीशिवाय परत पाठवण्यात आलं. तामिळनाडूमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, काही पुरुषांनी तिथलं पारंपरिक वस्त्र ‘अंगवस्त्रम’ घातलेल्या पुरुषांनाही हाच अनुभव आला. त्यांना फोटो काढल्याशिवाय परत धाडलं गेलं.
कॅम्प अधिकाऱ्यांकडून याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘आम्हाला त्याच पुरुषांचे फोटो काढण्यास सांगितलं आहे ज्यांनी कॉलरवाली टी-शर्ट किंवा शर्ट परिधान केलं असेल आणि महिलांनी ओढणी घेतलेली असेल’... आता बोला!
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.