नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी आता यापुढे प्रत्येक ट्रेनमध्ये ९० आरक्षित लोअर बर्थ असतील, अशी घोषणा रेल्वे बोर्डातर्फे करण्यात आली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनानुसार ५० टक्क्यांनी आरक्षण वाढ करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी आरक्षित जागा वाढवण्याची मागणी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली जात होती. आता रेल्वे मंत्र्यांनी या मागणीला प्रतिसाद देत रेल्वे अर्थसंकल्पात हा कोटा वाढवला आहे, असे रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी पीटीआय संस्थेशी बोलताना सांगितले.
येत्या १ एप्रिलपासून हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणला जाईल, असे जमशेद म्हणले. या वाढलेल्या कोट्यामुळे आता प्रत्येक ट्रेनमध्ये ८० ते ९० लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित असतील. ज्येष्ठ नागरिकांसोबतच ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलासुद्धा या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी पात्र असतील.
खरं तर २००७ साली या आरक्षित जागांची सुरुवात झाली होती. स्लीपर डब्यात एकूण दोन लोअर बर्थ आरक्षित ठेवण्यात आले होते. २०१५ साली हे आरक्षण वाढवून प्रत्येक स्लीपर डब्यात चार लोअर बर्थ इतके करण्यात आले. आता मात्र यात वाढ करुन स्लीपर डब्यात ही संख्या सहा इतकी करण्यात आली आहे; तर एसी ३-टिअर आणि एसी २-टिअरच्या प्रत्येक डब्यात तीन लोअर बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत.
राजधानी एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस आणि पूर्णपणे वातानुकुलित असणाऱ्या ट्रेनच्या प्रत्येक डब्यात तीन लोअर बर्थ आरक्षित केले जाणार आहेत.