खासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक, काळ्या पट्ट्या बांधून निषेध

खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे.  सरकारच्या या निलंबन निर्णयाच्या विरोधात संसंदेच्या आवारात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलंय.  

Updated: Aug 4, 2015, 01:40 PM IST
खासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक, काळ्या पट्ट्या बांधून निषेध title=

नवी दिल्ली: खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे.  सरकारच्या या निलंबन निर्णयाच्या विरोधात संसंदेच्या आवारात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलंय. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या सर्वांसह काँग्रेसचे खासदार उपस्थित आहेत.

सरकारवर निशाणा साधण्यासाठी काँग्रेस सरसावली आहे. सरकार निलंबनाची खेळी खेळून एकतर्फी सभागृह चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. संसद अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गोंधळानंच सुरू आहे. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी सोमवारी अभूतपूर्व गोंधळ घातला. 

लोकसभेत सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी घोषणाबाजी करत बॅनर दाखवली. लोकसभा अध्यक्षांनी वारंवार सूचना देऊनही विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. त्यामुळं काँग्रेसच्या 25 गोंधळी खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं. यात महाराष्ट्रातल्या राजीव सातव यांचा समावेश आहे. 

तर दुसरीकडे राज्यसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदी प्रकरणी निवेदन स्पष्टीकरण दिलं. मात्र विरोधकांनी राजीनाम्याची मागणी करत गोंधळ घातला. त्यामुळं काही काळासाठी कामकाज तहकूब करावं लागलं. संसदेत गेल्या 14 दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. विरोधक आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर सरकारही आपल्या भूमिकेवर कायम आहे. त्यामुळं पावसाळी अधिवेशन पाण्यात जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सर्व खासदारांना निलंबित केलं तरी चालेल, पण सुषमा स्वराज यांचा राजीनामा हवाच, असं राहुल गांधींनी म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.