www.24taas.com, नवी दिल्ली
लोकसभेत बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी झालेल्या धक्काबुक्की अधिकच गोंधळात भर पडली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चक्क समाजवादी पार्टीच्या खासदार यशवीर सिंग यांचे मानगुट पकडले. याचवेळी सोनिया यांनाही धक्काबुक्की झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, गोंधळाच्यावेळी लोकसभेचे कामकाज आणि थेट प्रक्षेपणही थांबविण्यात आले.
सरकारी नोकर्यांकमध्ये एससी, एसटी कर्मचार्यां ना बढतीमध्ये आरक्षण देण्यास समाजवादी पार्टीच्या खासदारांनी लोकसभेत जोरदार विरोध केला. हे विधेयक मांडत असताना पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांच्या हातातील विधेयक सपाचे खासदार यशवीर सिंग यांनी हिसकावून घेत ते फाडून टाकले. या प्रकारानंतर सोनिया गांधी संतापल्या. त्यांनी यशवीर सिंग यांच्या मानगुटीला धरले. त्यामुळे लोकसभेत गोंधळ झाला. काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार आणि कांतीलाल भुरिया यांनीही यशवीर सिंग यांना धक्काबुक्की केली.
काँग्रेसने राज्यसभेत बढतीमधील आरक्षणाचे विधेयक मंजूर केले, मात्र लोकसभेत समाजवादी पक्ष आणि शिवसेनेने या विधेयकाला करण्याचे स्पष्ट केले होते. समाजवादी पक्षाने याबाबतीत कमालीची आक्रमक भूमिका सभागृहात घेतली होती. यावेळी गोंधळाचे वातावरण झाल्याने कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले होते.
दुपारी ३ वाजता कामकाज सुरू होताच सगळ्यांच्या नजरा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणसामी मांडत असलेल्या विधेयकावर लागल्या होत्या. नारायणसामी हे विधेयक मांडत असताना समाजावादी पक्षाचे खासदार त्याच्या निषेधार्थ वेलमध्ये उतरले आणि जोरजोरात घोषणा देऊ लागले. इतक्यात काही कळण्याच्या आत उत्तर प्रदेशमधील नगीनाचे खासदार यशवीर सिंग यांनी अत्यंत चपळतेने नारायणसामी यांच्या हातातील विधेयक हिसकावून घेतले व ते पुन्हा वेलमधून सभापटलाकडे परत निघाले. यशवीर सिंग वेलकडे परतत असतानाच सोनिया गांधी यांनी झडप घातली आणि त्यांच्या बखोटीला धरले. यावेळी सोनियांना जोरात धक्का देऊन यशवीर सिंग निघण्याचा प्रयत्न करू लागले.
यशवीर सिंग यांनी विधेयकाचे तुकडे करून वेलच्या दिशेने भिरकावले. सोनियांना धक्का देऊन यशवीर निघालेले असताना नागपूरचे काँग्रेस खासदार विलास मुत्तेमवार आणि मध्य प्रदेशातील कांतीलाल भुरिया यांनी यशवीर सिंग यांना पकडण्याचा आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. यावेळी समाजवादी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरणसिंग आखाड्यात उतरले. त्यांच्या मदतीला माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे चिरंजीव नीरज शेखर तसेच मुलायमसिंग यांचे पुतणे धर्मेंद्र यादव हेही काँग्रेस खासदारांच्या दिशेने चालून गेले, मात्र दोन्ही बाजूच्या काही समंजस सदस्यांनी दोन्हीकडच्या सदस्यांना रोखल्यामुळे पुढचा अनर्थ ठरला.