सोनियांनी सांगितले तर झाडूही मारेन!

`काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया मॅडमनी आदेश दिला तर मी झाडूही हातात घेईन आणि काँग्रेसच्या कार्यालयाची साफसफाईसुद्धा करेन, असे धक्कादायक वक्तव्य केले केंद्रीय कृषी राज्यमंत्री डॉ. चरणदास महंत यांनी... काँग्रेस पक्षामध्ये चमचेगिरी कोणत्या थराला गेली आहे याचे हे उत्तम उदाहरण.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 18, 2013, 06:05 PM IST

www.24taas.com, झी मीडीया, रायपूर
`काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया मॅडमनी आदेश दिला तर मी झाडूही हातात घेईन आणि काँग्रेसच्या कार्यालयाची साफसफाईसुद्धा करेन, असे धक्कादायक वक्तव्य केले केंद्रीय कृषी राज्यमंत्री डॉ. चरणदास महंत यांनी... काँग्रेस पक्षामध्ये चमचेगिरी कोणत्या थराला गेली आहे याचे हे उत्तम उदाहरण.
नक्षलवादी हल्ल्यात छत्तीसगडमधील काँग्रेस नेतृत्वाची एक फळीच नष्ट झाली आहे. सक्षम नेत्यांची वानवा असल्यामुळे हायकमांडने राज्यातील एकमेव खासदार असलेल्या महंत यांना छत्तीसगड काँग्रेसचे कार्याध्यक्षपद बहाल केले आहे. केंद्रात राज्यमंत्रीपद असतानाही हे पद मिळाल्याने महंत भारावून गेले आहेत. सोनिया गांधी यांनी दाखवलेली कृपादृष्टीमुळे महंत यांनी असा प्रकारे चापलुसी केली आहे.
`सोनिया गांधी आणि राहुलजींच्या आदेशाचे महत्त्व माझ्या लेखी सर्वात मोठे आहे. आजपर्यंत नेहमीच मी त्यांच्या आदेशाचे पालन करत आलोय आणि यापुढेही करीन. वेळ पडल्यास त्यांच्या शब्दाखातर झाडू घेऊन काँग्रेसच्या कार्यालयाची साफसफाईसुद्धा करेन, असे त्यांनी यावेळी सांगितले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिल्यानंतर ग्यानी झेलसिंग यांनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली होती. देशाचे सर्वोच्च पद भूषविणाऱ्या झेलसिंग यांना या वक्तव्याबद्दल टीकाही सहन करावी लागली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.