सातारा: सियाचीनमध्ये हिमकडा कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेमध्ये दहा भारतीय जवान शहीद झाले. यापैकी एक जवान हा साताऱ्याचा आहे.
सुनिल विठ्ठल सुर्यवंशी असं या जवानाचं नाव आहे. सुनिल हे सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील मस्करवाडी गावात राहायचे. सुनिल हे शहीद झाल्याचं कळल्यामुळे त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे.
शहीद झालेले हे दहाही जवान गस्तीसाठी असलेल्या चौकीमध्ये होते. पण हिमकडा कोसळल्यामुळे हे सगळे जण बेपत्ता झाले. या जवानांजवळ असलेल्या रेडिओचा संपर्क तुटल्यामुळे हिमकडा कोसळल्याची माहिती मिळाली.
त्यांच्या वाचण्याची शक्यता कमी असल्यानं संरक्षण खात्यानं या जवानांना शहीद घोषीत केलं. सियाचीन या 22 हजार फूट उंचीवर असलेल्या भागावर भारतीय लष्कराची बाना चौकी आहे.