www.24taas.com, चंदीगढ
खाप पंचायत नेहमीच आपल्या अजब-गजब निर्णयांनी वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. मात्र त्यावर कोणाचाही निर्बंध नसतो. अनेक छोट्या गावामध्ये या खाप पंचायतची दहशतही तितकीच असते. आणि त्यामुळेच त्यांचे निर्णय मानणं हे देखील गावकऱ्यांना भाग पडतं. हरियाणामध्ये सामूहिक बलात्कारांच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. राज्यात गेल्या 22 दिवसांत चार सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.
या घटना थांबविण्यासाठी कमी वयातच मुला-मुलींचे लग्न करावेत, असा ठराव खाप पंचायतीने केला आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार मुलाचे वय 21 वर्षे आणि मुलीचे वय 18 वर्षे निर्धारित करण्यात आले आहे. परंतु, खाप पंचायतीनुसार मुलाचे वय 18 वर्षे आणि मुलीचे वय 16 वर्षे करण्यात यावे, असा प्रस्ताव केंद्र सरकारसमोर ठेवण्यात येणार आहे. विवाहाची वयोमर्यादा कमी केल्याने बलात्कारांच्या घटना थांबतील, असा दावाही खाप पंचायतींनी केला आहे.
अश्लील साहित्य, अश्लील चित्रपट तसेच टीव्हीवरील अश्लील कार्यक्रमांमुळेच व्यक्तीमध्ये ही क्रूर प्रवृत्त निर्माण होत असल्याचेही खाप पंचायतीने म्हटले आहे.