मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयच्या एका साक्षीदारानं पीटर मुखर्जीवर गंभीर आरोप केले आहेत. पीटर मुखर्जीकडे कोणतीही नैतिकता नव्हती, त्याच्या आयुष्यामध्ये अनेक महिला होत्या, असं या साक्षीदारानं सांगितलं आहे.
सीबीआयकडून पीटर मुखर्जीची आधीची पत्नीची गुप्त साक्षीदार म्हणून साक्ष घेण्यात आली, तेव्हा तिनं हा दावा केला आहे. पीटरला रात्री उशीरापर्यंत पार्टी करायची सवय होती, त्याच्या आयुष्यात बऱ्याच महिला होत्या, म्हणून मी त्याच्याशी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला, असंही ती म्हणाली आहे.
घटस्फोट झाल्यानंतर शीनाच्या हत्येतली प्रमुख आरोपी इंद्राणीला पीटरनं माझी गर्लफ्रेंड म्हणून ओळख करून दिली, असंही तिनं सांगितलं आहे. मी इंद्राणीशी लग्न करणार आहे, असं मला सांगितलं. यानंतर तु कधीच सुधारणार नाहीस अशी प्रतिक्रिया मी पीटरला दिली, असं वक्तव्य साक्षीदारानं केलं आहे.
मला वाटलं होतं, पीटर इंद्राणीबरोबर लग्न करणार नाही. मागच्या मैत्रिणींसारखाच तो इंद्राणीला पण सोडून देईल, कारण त्याला तरुण मुली आवडायच्या असं तिने साक्षीमध्ये सांगितलं आहे.
या साक्षीनंतर तिची सुरक्षा वाढवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. दरम्यान साक्षीदारानं केलेले आरोप पीटरचे वकील मिहीर घीवाला यांनी फेटाळून लावले आहेत. या आरोपांमुळे पीटरची बदनामी झाल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.