मुंबई : कल्पना चावला, सुनिता विल्यम्सनंतर भारताची आणखी एक कन्या आकाशभरारीसाठी सज्ज झालीय.
'बेटियाँ किसी से कम नही होती, मुझे अपनी बेटी पर नाज है...' असं बोलताना इंदिरा पंडया यांच्या डोळ्यांत आपल्या मुलीवरचं कौतुक दिसतं... हा आनंद आहे लेकीच्या यशाचा... लेकीनं घेतलेल्या आकाशभरारीचा...
डॉक्टर शॉना पंडया कॅनडामधल्या अलबर्टा युनिवर्सिटी हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन आहे. कॅनडाच्या सिटीजन सायन्स अॅस्ट्रोनॉट प्रोग्राम अर्थात (सीएसएसाठी तिची निवड झालीय. शॉना इतर आठ सहकाऱ्यांबरोबर अंतराळात जाणार आहे. 2018 मध्ये हे मिशन आयोजित करण्यात आलंय.
कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्सनंतर आकाशभरारी घेणारी ही तिसरी मुळची भारतीय असलेली महिला आहे. जैवशास्त्राचे विविध प्रयोग ती आंतराळात करणार आहे.
शॉनाचं लहानपणापासूनच आंतराळवीर बनण्याचं स्वप्न होतं. आता 2018 मध्ये ते पूर्ण होणार आहे. पंडया कॅनडामध्ये स्थायिक आहे. पण तिचे कुटुंबीय मुंबईत राहतात. न्यूरोसर्जनसह शॉना लेखक, ऑपेरा गायक, अंतरराष्ट्रीय ताइक्वांडो चॅम्पियनही आहे. शॉनाच्या या यशाचं तिच्या कुटुंबीयांना तर कौतुक आहेच, पण भारताची मानही अभिमानानं उंचावलीय.