सहारनपूर : ट्रीपल तलाकच्याविरोधात आता मुस्लिम महिलाच समोर येऊ लागल्या आहेत. उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमधील शगुफ्तानं तोंडी तलाकच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. एवढंच नव्हे तर यावर कायदेशीर बंदी घालण्याच्या मागणीसाठी थेट मोदींना साद घातलीय. शगुफ्तानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे धाव घेतलीय.
तिनं पंतप्रधानांना ट्रीपल तलाक प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी पत्रातून केलीय. सहारनपुरमधील शगुफ्ताला दोन मुली आहेत, आणि आता ती पुन्हा गरोदर आहे.
तिसरीही मुलगीच होईल असं तिच्या सासरच्या मंडळींना वाटलं. त्यामुळे त्यांनी शगुफ्ताला जबरदस्ती गर्भपातासाठी नेलं. तिनं याला नकार दिल्यानं शगुफ्ताच्या नव-यानं तिला मारहाण तर केलीच. शिवाय ट्रीपलं तलाकही दिलाय. शगुफ्ता पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानं तिला सासरकडच्यांनी धमकावलं. या त्रासाला कंटाळून अखेर तिनं थेट पंतप्रधानांनाच मदतीसाठी साकडं घातलंय. शगुफ्ताला न्याय मिळणार का याकेडच सा-यांच लक्ष लागलं आहे.